तासगाव : राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांनी अधिवेशनात अवकाळीच्या नुकसानीने द्राक्ष बागांसह शेतीच्या नुकसानीची व्यथा मांडली. मात्र शासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आमदार सुमनताई पाटील, आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांनी कुजलेली द्राक्ष घेऊन नागपुरात विधानभवनाच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन केले. शासनाने शेतकऱ्यांचे शेती कर्ज माफ करून द्राक्षबागांना एकरी लाख रुपये भरपाई द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करू, असा इशारा यावेळी आमदार रोहित पवार यांनी दिला.आमदार सुमनताई पाटील शेतकऱ्यांच्या व्यथा अधिवेशनात मांडत आहेत. मात्र सरकार यावर बोलायला तयार नाही. एनडीआरएफ निकषानुसार चारपट मदत सरकारने तात्काळ द्यायला हवी. मात्र सरकार केवळ घोषणा करत आहे. द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना भेटूच; पण कुठल्या ना कुठल्या तरी मंत्र्याला भेटून त्याच्यावर ठोक असा निर्णय घेण्याची त्यांना विनंती करू. विनंतीला मान दिला नाही, तर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलनातून न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. आमदारकीपेक्षा लोकांचं हित महत्त्वाचं आहे. त्यासाठी जे करायला लागेल ते करू, असा इशारा यावेळी रोहित पवार यांनी दिला.
सलग तीन वर्ष अडचण असेल तर शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे. पिकवलेला माल कुजल्यामुळे त्याची किंमत होत नाही. अशा द्राक्षाला कुठे एक रुपया सुद्धा मिळणार नाही, त्यामुळे लोकांनी द्राक्षबागा काढण्याचा विचार केला आहे. द्राक्ष बागायतदारांना मदत होत नसेल तर आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत.
गेल्या वर्षीची मदत अजून मिळाली नाही. द्राक्ष पिकात सर्वाधिक गुंतवणूक होते. त्यात नुकसान झालं तर मदत द्यायला हवी. मात्र पंचनामे अजिबात झालेले नाहीत. पंचनामे झाले म्हणून सत्ताधारी नेत्यांकडून खोटं सांगितलं जात आहे, अशी टीका आमदार पवार यांनी यावेळी केली.
या मागण्यांसाठी ठिय्या
- द्राक्ष उत्पादकांचे सर्व कर्ज माफ करून एकरी एक लाख रुपये मदत करावी.
- द्राक्ष घेऊन पळून जाणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायदा बनवावा.
- द्राक्षास १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर दरम्यानच्या काळातील पिक विमा लागू करावा. जाचक अटी रद्द करून भरपाईच्या रकमेत वाढ करावी.
- सरसकट पंचनामे करावेत.