सांगली : ख्रिश्चन धर्मियांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. ख्रिस्ती बांधव आणि चर्चवरील हल्ल्यांविरोधात मोर्चाचे आयोजन केले होते. सांगली, मिरजेसह जिल्हाभरातून हजारो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले.देशभरातील ख्रिस्ती धर्मगुरू व चर्चवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून आंदोलक आले होते. विश्रामबाग चौकातून सुरुवात झाली. शिस्तबद्ध मूक मोर्चा निघाला. निषेधाचे फलक झळकाविले होते. भारतीय ख्रिश्चन असल्याचा अभिमान आहे, चर्च व धर्मगुरूंवरील हल्ले त्वरित थांबवा, हल्लेखोरांचा बंदोबस्त करा, धर्माच्या शिकवणीनुसार भक्तीचा आमचा हक्क आहे, अशा घोषणा लिहिल्या होत्या. घोषणाबाजी न करता फलकांद्वारेच आंदोलकांनी भावना व्यक्त केल्या. हातावर आणि कपाळावर काळ्या फिती तसेच काळे मास्क वापरून निषेध केला.जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सभेत आकाश तिवडे म्हणाले, धर्मगुरूंवर खोटे आरोप व गुन्हे दाखल केले जात आहेत. धर्मांतराचा आरोप केला जात आहे. संविधानानुसार जगण्याचा हक्क हिरावला जात आहे. पुरोगामी महाराष्ट्रात ख्रिश्चनांना टार्गेट केले जात आहे. खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत. नासधूस झालेल्या चर्चना भरपाई मिळावी.ते म्हणाले, आटपाडीत रुग्णावर मांत्रिकी उपचाराच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी. धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी. ख्रिस्ती धर्माच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या वधस्तंभाचा अवमान केला जात आहे. धर्मस्थळे पाडण्याची वक्तव्ये सुरू आहेत. सोशल मीडियातून ख्रिस्ती विधी, प्रभू भोजन विधीसंदर्भात संभ्रम निर्माण केला जात आहे.मोर्चाचे संयोजन आशिष कच्छी, गॅब्रिएल तिवडे, सॅमसन तिवडे, सचिन जाधव, संजय कोलप, अल्बर्ट सावर्डेकर, राम कांबळे, विजय वायदंडे आदींनी केले.
संघटनांचा पाठिंबामोर्चाला बहुजन क्रांती मोर्चा, मुस्लीम समाज, काँग्रेस, राष्ट्रवादी, मातंग समाज, रिपाइं (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे इंद्रजित घाटे, बेथेलहेमनगर रहिवासी संघ आदींनी पाठिंबा दिला होता. मुस्लीम जमियतने नाश्ता व पाण्याची सोय केली.दृष्टिक्षेपात मोर्चा...
- हजारोंच्या संख्येने आंदोलकांमुळे एकेरी वाहतूक बंद. सांगली-मिरज मार्गावर वाहनांच्या रांगा.
- परिचारिका, डॉक्टर्स, रेल्वे कर्मचारी गणवेशातच सहभागी.
- अग्रभागी तिरंगा ध्वज, ख्रिश्चनांसाठी पवित्र असणारा वधस्तंभ.
- शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संरक्षणाची मागणी.