राज्यात कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालयात विवाह समारंभास ५० लोकांची मर्यादा शासनाने घालून दिली आहे. कार्यालय चालक संघटनेतर्फे विवाह समारंभास लोकांची मर्यादा आसनक्षमतेनुसार वाढवून देण्याची मागणी वारंवार करण्यांत आली. मात्र त्याबाबत आजपर्यंत शासनाकडून कोणताही निर्णय झाला नाही. आता कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने शासनाने नवीन नियमावलीतही मंगल कार्यालयासाठी ५० लोकांचीच मर्यादा दिली आहे. मात्र हॉटेल, कोचिंग क्लास, नाट्य, चित्रपटगृह, सभागृहात मात्र क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवागनी दिली आहे. हा भेदभाव करून शासनाने मंगल कार्यालय, केटरर्स व कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. विविध कर, वीज व पाणी बिलामुळे मंगल कार्यालय चालकांचा उदरनिर्वाह अडचणीत आहे. त्यामुळे शासकीय निर्बंधाचा निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मंगल कार्यालय चालकांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलन करणार असल्याचेही ओंकार शुक्ल, चंद्रकांत देशपांडे, महेश अर्जुनवाडकर, अभय आठवले, भरत देशपांडे, विवेक गवळी, स्नेहल खरे, चंद्रकांत पिसे, किरण बैरागी, विनोद गोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.
विवाहास उपस्थितीबाबत मर्यादेचा मंगल कार्यालय चालकाकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:27 AM