मिरज : मिरजेत शिवाजी रस्त्यावर असलेली शासकीय जागा हडप करण्यास विरोध केल्यामुळे बांधकाम व्यावसायिकाने ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आशालता हेटकाळे व ॲड प्रविणा हेटकाळे यांनी पोलिसांत केली आहे.
मिरजेतील छत्रपती शिवाजी रस्त्यावर लष्करी जवानांसाठी शासनाची जागा आरक्षित आहे. भूमापन अधिकाऱ्यांशी संगनमत करून मृत व्यक्तींना नोटीस बजावून मोजणी करून ही जागा गिळंकृत करण्याचा बांधकाम व्यावसायिकाचा प्रयत्न आहे. शासकीय जागेलगतची मिळकत विकसित करण्यासाठी घेऊन सुमारे ६०० चाैरस फूट शासनाची जागा बळकाविण्याचा प्रयत्न असल्याची हेटकाळे यांची तक्रार आहे.
महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासकीय बांधकाम परवाना घेण्यात आला. या बेकायदा बांधकाम परवान्यास हरकत घेतल्याने महापालिकेने या बांधकाम परवान्याला स्थगिती दिली. त्यानंतर बिल्डरने नगर भूमापन अधिकाऱ्यांकडे हद्द मोजणीसाठी मिळकतीलगतच्या दोन मृत व्यक्तींना नोटीस बजावली आहे. यास हरकत घेतल्याने ही मोजणी रद्द करून पुन्हा ठेवण्यात येत आहे. याबाबत वारंवार तक्रार करीत असल्याने अनोळखी व्यक्तीने घरात येऊन मोजणीच्या वेळी पुन्हा हरकत घेतल्यास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आशा हेटकाळे व ॲड प्रविणा हेटकाळे यांनी पोलिसांत केली आहे.