सांगली : केंद्र शासनाच्या साहाय्याने महापालिकेकडून ई-बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी टिंबर एरियातील महापालिकेच्या मालकीच्या जागेत बस डेपो व चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. त्याला शिव, फुले, शाहू आंबेडकर, साठे संघर्ष चळवळ समितीने विरोध केला असून मंगळवारी समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.यावेळी आयुक्तांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, प्रभाग दहामधील शाळा नंबर २२ च्या क्रीडांगणावर डेपो व चार्जिंग स्टेशन केले जाणार आहे. या परिसरात एकही क्रीडांगण उरणार नाही. मैदानावर परिसरातील मुले सराव करीत असतात. याशिवाय सांगलीत महापूर आल्यानंतर भीमनगर, संजय गांधी झोपडपट्टी, गोकुळनगर परिसरातील लोकांना याच क्रीडांगण व शाळेत स्थलांतरित केले जाते. प्रस्तावित डेपोमुळे अवजड वाहनांची ये- जा वाढल्याने लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी प्रस्तावित ई-बस डेपो रद्द करून अन्यत्र जागेचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.यावेळी विनायक हेगडे, प्रकाश कांबळे, नितीन माने, विशाल पवार, नवीचंद मोरकाने, राजेश आरवळे, संजय शिंदे, गणेश मासाळ, अश्विनकुमार मुळके, अमेय कोलप उपस्थित होते.
लढा क्रीडांगण, खेळाडूंसाठी; सांगलीत ई-बस डेपोच्या जागेच्या विरोधात निदर्शने
By शीतल पाटील | Published: October 10, 2023 6:51 PM