सांगली : माकपचे नेते सीताराम येचुरी, अर्थशास्त्र अभ्यासक जयंती घोष यांच्यासह अनेकांवर दिल्ली दंगल भडकविल्याचे खोटे आरोप दिल्ली पोलिसांनी ठेवल्याबद्दल निषेध करीत माकपतर्फे सांगलीत निदर्शने करण्यात आली.सांगलीच्या स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार मुर्दाबाद, धर्मनिरपेक्ष जिंदाबाद, मोदी-शहा मुर्दाबाद, दिल्ली दंगलीचे दोषी कोण?, संघ-भाजप आणखी कोण! अशा घोषणा देत माकप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
यावेळी उमेश देशमुख म्हणाले की, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, जयंती घोष, स्वराज्य अभियानाचे अपूर्वानंद, माहितीपटाचे दिग्दर्शक राहुल रॉय यांच्यावर दिल्ली दंगल भडकविल्याचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत.
दिल्ली पोलिसांची व केंद्र शासनाची ही कृती अत्यंत निषेधार्ह व हुकुमशाहीला प्रोत्साहन देणारी आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, व गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या कारवाईचा निषेध करीत आहोत.
येचुरी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. गुन्हे मागे न घेतल्यास आम्ही पुन्हा याबाबत आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात देशमुख यांच्यासह दिगंबर कांबळे, नितीन पाटील, संजय कांबळे, रियाज जमादार, किशोर केदारी आदी सहभागी झाले होते.