सांगलीत आंदोलन : व्यवस्थापनाने नोकरभरती करावी, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी सांगलीत ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : व्यवस्थापनाने पुरेशी नोकरभरती करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी सांगलीत ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र बँकेत देशभरातील सुमारे १९०० शाखांतून काम करणाऱ्या संघटनेच्या पाच हजारांवर सभासदांनी आपापल्या शाखेसमोर तीव्र निदर्शने केली. बँकेत अकराशेपेक्षा जास्त शाखेतून कायमस्वरूपी सफाई कर्मचारी नाहीत, तर सहाशेपेक्षा जास्त शाखेतून कायमस्वरूपी शिपाई नेमले गेलेले नाहीत. बँकेने गेल्या पाच वर्षांपासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा, पदोन्नती यामुळे रिकाम्या झालेल्या क्लार्कच्या जागा भरलेल्या नाहीत. त्या अंदाजे एक हजारपेक्षा जास्त जागा आहेत. याशिवाय नवीन शाखा उघडल्या, व्यवसायात वाढ झाली. यामुळे रिकाम्या झालेल्या जागा या वेगळ्याच. पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी बँकेतील नित्याचे कामदेखील आऊटसोर्स केले जात आहे. ज्यामुळे बँकेत आर्थिक घोटाळे होण्याच्या शक्यता निर्माण होतात. याशिवाय बँक अनेक वर्षांपासून चालू असलेल्या प्रथेला सोडचिठ्ठी देऊन, कर्मचाऱ्यांशी निगडित निर्णय युनियनला विश्वासात न घेता एकतर्फी घेत आहे ज्यावर युनियनने तीव्र आक्षेप घेतला आहे.
आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात संघटनेतर्फे २६ फेब्रुवारी रोजी बँकेच्या देशभरातील ३७ झोनल ऑफिससमोर धरणे, तर ६ मार्च रोजी केंद्रीय कार्यालय, लोकमंगल, पुणे येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शेवटी १२ मार्च रोजी देशव्यापी संप करण्यात येत आहे, असे सचिव देवीदास तुळजापूरकर यांनी म्हटले आहे.