मिरज : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे राज्यपाल नियुक्त आमदार इद्रिस नायकवडी हे ‘वंदे मातरम’च्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे. अल्पसंख्यांकाबद्दल द्वेष असल्याने राऊत असे खोटे आरोप करीत आहेत. माझ्या नादी त्यांनी लागू नये, त्यांना मी परवडणार नाही, असा इशारा आमदार इद्रिस नायकवडी यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत दिला.नायकवडी म्हणाले, राज्यात सात जणांची नियुक्ती झाली, मात्र इद्रिस नायकवडी हे राऊत यांना खूपत आहे. अल्पसंख्यांक समाजाबद्दल राऊत यांची द्वेषाची भावना आहे. आजपर्यंत कोणावरही केलेले आरोप संजय राऊत सिद्ध करू शकले नाहीत. मी ‘वंदे मातरम’ला विरोध केलेला नाही. त्याबद्दल मला आदरच आहे.मिरजेत सनातन प्रभात कार्यालयावर झालेल्या हल्ल्यात माझा संबंध नसतानाही त्यात मला गुंतवले होते. यातून न्यायालयाने माझी निर्दोष सुटका केली. मग संजय राऊत काय न्यायालयापेक्षा मोठे आहेत का? विधान परिषदेत मुस्लीम समाजाचा प्रतिनिधित्व करणारा मी एकमेव असल्याने संजय राऊत यांना खूपत आहे. त्यांनी माझ्यावरील आरोप सिद्ध करुन दाखवावेत, असे आव्हान त्यांनी दिले.
शरद पवार यांनी शब्द पाळला नाहीराष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानपरिषदेवर संधी देतो म्हणून २५ वर्षांपूर्वी माझे वडील इलियास नायकवडी यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास भाग पडले. मात्र शब्द पाळला नाही. मात्र अजित पवार यांनी अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी व आमदार म्हणून मला संधी दिली. त्यांच्याकडून इतरांनी नैतिकता शिकावी, असा टोला नायकवडी यांनी लगावला.
विधानपरिषदेत आवाज उठवणारविधानपरिषदेत एकमेव मुस्लीम सदस्य आमदार म्हणून आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात तासगाव, इस्लामपूर व शिराळा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.