अशोक पाटील -इस्लामपूर शहरात कोट्यवधी रुपयांचा विकास झाला आहे. त्या झालेल्या विकासाचा अगोदर चुकता हिशेब द्या, नंतरच निकृष्ट दर्जाच्या विकास कामांचे उद्घाटन करा, असे आव्हान भाजप युवा मोर्चाचे विक्रम पाटील व विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी सत्ताधाऱ्यांना ‘लोकमत’शी बोलताना दिला.पाटील व कुंभार म्हणाले, इस्लामपूर शहरात झालेल्या विकासाचा भकास झाला आहे. चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आलेला पोहण्याचा तलाव भुईसपाट झाला आहे. कोट तलावाचे काम बंद आहे. नवीन केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांवर १५ दिवसात खड्डे पडले आहेत. उद्घाटन होत असलेल्या व्यापारी संकुलनाचे चुकीच्या पध्दतीने टेंडर काढण्यात आले आहे. महादेवनगर येथील घरकुलांची अवस्था दयनीय झाली आहे. भुयारी गटार योजनेचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. २४ बाय ७ पाणी योजना अद्यापही अधांतरीच आहे.अत्याधुनिक सिग्नल, डिजिटल लायब्ररी, वायफाय योजनेच्या फक्त घोषणाच झाल्या आहेत. अन्यायकारक विकास आराखडा अद्यापही शासनदरबारी प्रलंबित आहे. सर्व्हेसाठी पालिकेच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात आली आहे. चौकांच्या सुशोभिकरणाचा पत्ता नाही. शहरातील वाहतूक कोंडी सर्वसामान्यांसाठी जीवघेणी बनली आहे. शतकोटी वृक्षारोपणाचे तीनतेरा वाजले आहेत, असाही आरोप कुंभार व पाटील यांनी केला.नगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांचा दर्जा तपासून पाहण्याची गरज आहे. त्याचा अगोदर त्यांनी हिशेब द्यावा. आता केंद्रात व राज्यात सत्ता आमची आहे. त्यामुळे येथून पुढे होणाऱ्या विकासकामांचे आम्ही बघून घेऊ. येणाऱ्या निवडणुकीत सत्ता आमचीच आहे. तेव्हा विकास कशाला म्हणतात, हे आम्ही सर्वांना दाखवून देऊ, असाही इशारा विरोधकांनी दिला आहे.विरोधकांना नामोहरम करूयाबाबत सत्ताधारी गटाचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील म्हणाले की, या विरोधकांना हिशेब मागण्याचा अधिकार कोणी दिला?, त्यासाठी किती पगार दिला जातो? पाटलाच्या वाड्यावर जेवणाचं आवतन न देता पंगतीला बसणाऱ्या विरोधकांची काय ताकद आहे? आम्ही केलेल्या विकास कामांची मापे काढण्याचा तुमचा प्रांत नाही, त्यामुळे तो प्रयत्न करू नका, पालिकेच्या आगामी निवडणुकीत २८ पैकी २८ जागा जिंकून विरोधकांना नामोहरम करून त्यांची जागा दाखवून देऊ, असेही ते म्हणाले.
इस्लामपूरच्या विकासाचा हिशेब द्या
By admin | Published: January 16, 2015 11:34 PM