विटा : सहकारी व खासगी सूतगिरण्या आणि यंत्रमाग असा वस्त्रोद्योगात भेदभाव केला जाणार नाही. राज्य सरकार सहकारी क्षेत्रातील सूतगिरण्यांना ज्या सुविधा व सवलती मिळतील, त्या सर्व सवलती यंत्रमागासह खासगी सूतगिरण्यांनाही शासन देणार आहे, असे आश्वासन महाराष्ट्राचे वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी मुंबई येथे शिष्टमंडळाशी बोलताना दिले. यावेळी त्यांनी, खासगी सूतगिरण्यांनी त्यांच्या प्रकल्पावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू केल्यास त्या प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.मुंबई येथे वस्त्रोद्योगमंत्री देशमुख यांच्या दालनात राज्यातील खासगी सूतगिरणी यंत्रमाग प्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी मंत्री देशमुख यांनी प्रतिनिधींना हे आश्वासन दिले. या बैठकीस विटा येथील विराज स्पिनर्स व यंत्रमाग संघाच्यावतीने किरण तारळेकर, विठ्ठल कार्पोरेशनचे अध्यक्ष संजय शिंदे, संजय जमदाडे उपस्थित होते. बैठकीत खासगी सूतगिरणी प्रतिनिधींनी, सहकारी सूतगिरण्यांना राज्य सरकार मोठ्या प्रमाणात मदत करत असताना, यंत्रमाग व खासगी सूतगिरण्यांना शासन दुजाभाव करीत असल्याची खंत यंत्रमाग संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वस्त्रोद्योगमंत्री देशमुख यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी सहकारी सूतगिरण्यांप्रमाणेच प्रति चात्यास ३ हजार रूपये खासगी सूतगिरण्यांनाही बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे व अतिरिक्त असलेले विजेचे दर कमी करून इतर राज्यांच्या तुलनेत वीज दर असले पाहिजेत, अशी मागणी खासगी सूतगिरणीच्या प्रतिनिधींनी केली. राज्यात विजेचे दर महाग असल्याने यंत्रमाग व सूतगिरणी उद्योग चालविणे आणि स्पर्धेत टिकाव धरणे अवघड झाल्याचेही निदर्शनास आणून दिले.यावेळी मंत्री देशमुख यांनी, सहकारी व खासगी असा भेदभाव केला जाणार नाही, ज्या खासगी सूतगिरण्या त्यांच्या प्रकल्पावर सौरऊर्जा प्रकल्प उभा करतील, अशा खासगी सूतगिरण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. या बैठकीस नागरिका एक्स्पोर्टचे सुनील पटवारी, विवेक गर्ग, टेक्नोक्रॉप्ट इंडस्ट्रीजचे आशिष सराफ, फॅबटेकचे भाऊसाहेब रूपनर, दिनेश रूपनर, जालनाचे संजय राठी, राजू पटोडिया, आर. एम. मोहिते इंडस्ट्रीजचे अभय भिडे, विज्ञान मुंढे, विलास सूर्यवंशी, के. शंकरमणी, अनिल सावंत, किरण मेहता, पी. कृष्णन् यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते. (वार्ताहर)
यंत्रमागासह खासगी सूतगिरण्यांना सवलती देऊ
By admin | Published: July 29, 2016 12:02 AM