लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये कार्यरत कायम, बदली, मानधन आणि रोजंदारीवरील सफाई कर्मचाऱ्यांना मोफत हक्काची घरे मिळण्यासाठी शासनाने लोकनेते शरदचंद्र पवार सफाई कामगार आवास घरकुल योजना सुरू करावी, अशी मागणी संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
याबाबत संघटनेचे अध्यक्ष महेशकुमार कांबळे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांना प्रत्यक्ष निवेदन दिले. यावेळी २००५ नंतर सफाई कामगारांना पेन्शन योजना सुरू करावी, सफाई कामगारांना रेशन कार्ड पिवळे द्यावे, त्यांची घरपट्टी आणि पाणी बिल शासनाने तात्काळ माफ करण्याचे आदेश द्यावेत, सांगली महापालिकेतील सर्व बदली कामगारांना सेवेत कायम करावे, त्यांचा प्रत्येकी २५ लाख रकमेचा विमा शासनाने उतरवावा, रेल्वे रुग्णालयाच्या धर्तीवर सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर उपचार मोफत करण्यासाठी मिरज येथे शासनाने मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारवे, यांसह विविध मागण्या करण्यात आल्या.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.