सांगली : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा शेतकर्यांना लाभ मिळण्यात अडचणी येत आहे. कृषी विभागाने प्राधान्याने योजनेचा शेतकर्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिल्या.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतकर्यांसाठी ही योजना अत्यंत लाभकारक असतानाही त्याचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. शेतकर्याच्या अपघाती मृत्यूनंतर कागदपत्रांची पूर्तता करून तातडीने लाभ कुटूंबाला मिळावा.शेतकर्यांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा असल्याने शेतकर्यांना पावसाळ्यापूर्वी कृषी पंपाच्या विद्युत जोडण्या पूर्ण करण्याचे नियोजन महावितरणने करावे.
याबाबत ज्या ठेकेदाराकडे काम आहे त्याचे काम समाधानकारक नाही त्यामुळे शेतकर्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची मदत घेऊन काम सुरू करावे अशी सूचना त्यांनी दिल्या.
पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत,पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.