सांगली : कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना व एक पालक गमावलेल्या बालकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात यावा. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना 5 लाख रुपये रक्कमेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने सर्व अटी शर्तीची पुर्तता करून कार्यवाही करावी. तसेच ज्या बालकांना शिक्षणासाठी मदत हवी असेल अशांना विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून मदत मिळवून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात बालसंरक्षण हक्क समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश विश्वास माने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील व राहुल रोकडे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) शिल्पा पाटील, जिल्हा परिविक्षा अधिकारी एस. एच. बेंन्द्रे, बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. सुचेता मलवाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाबासाहेब नागरगोजे. तसेच पलुस, कडेगाव, कवठेमहांकाळ, खानापुर, विटा, तासगांव व शिराळा नगरपालिका/ नगरपंचायत मुख्याधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये कोवीड-19 च्या प्रादुर्भावाने एक पालक व दोन्ही पालक गमावलेल्या अशा एकुण 699 बालकांची प्राथमिक यादी प्राप्त झाली असून त्यापैकी 396 बालकांची नावे पोर्टलवर अद्ययावत केली आहेत. उर्वरीत बालकांची संपूर्ण माहिती गृह चौकशी करुन पोर्टलवर अद्ययावत करावी. 396 बालकांपैकी 231 बालके ही शाळेत जाणारी असून त्या बालकांना शाळेत प्रवेश मिळवून द्यावेत.
बालगृहातील कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण त्वरीत करून घ्यावे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे स्थानिक पालक नियुक्तीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. जिल्ह्यातील कोरोनामुळे पती गमावलेल्या विधवा महिलांची संख्या 193 असून अतिरिक्त यादी असल्यास तालुका निहाय प्रशासनास द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.