कोकरुड : यावर्षी झालेल्या पावसाने वारणा नदीकाठच्या गावांचे ज्या पद्धतीने मोठे नुकसान झाले. नुकसान पश्चिम भागामध्ये डोंगर कपारीमध्ये राहणाऱ्या लोकांचेही झाले. शासनाने या नुकसानग्रस्त लोकांना तत्काळ मदत देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.
भारतीय जनता पार्टी घनसोली-नवी मुंबई व भारतीय जनता पार्टी शिराळा तालुका यांच्यावतीने शिराळा तालुक्यातील कोकणेवाडी व भाष्टे वस्ती येथील स्थलांतरित कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी नाईक बोलत होते.
नाईक म्हणाले की, शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात राहणाऱ्या लोकांचे या वर्षीच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. वारणा नदी काठचा भाग महापुरामुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने घरांचे नुकसान झाले आहे. प्रचंड पावसामुळे या भागातील डोंगर कपारीमध्ये राहणाऱ्या वाडी-वस्त्यांमधील लोक जीव मुठीत घेऊन राहत होते. राहत्या घरामध्ये जमिनीमधून पावसाच्या पाण्याचे उमाळे उमटले होते. मोठ्या प्रमाणात डोंगराच्या दरडी घसरत होत्या. अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. या गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे.
यावेळी जि. प. सदस्य संपतराव देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील, माजी सभापती हणमंत पाटील, माजी सरपंच हिंदूराव नागरे, माजी उपसभापती नथुराम लोहार, मोहन पाटील, आनंदराव पाटील, प्रकाश जाधव, मणदूर सरपंच वसंत पाटील, सरपंच आनंदा कांबळे, सरपंच सखाराम दुर्गे, अशोक बेर्डे ,कैलास पाटील, प्रकाश भुसारी, बाबूराव गावडे, खाशाबा आटूगटे उपस्थित होते.
चौकट
तहसीलदार, बीडीओंकडून चांगली कामगिरी
यावर्षी आलेल्या महापूर अतिवृष्टीवेळी शिराळा तहसीलदार गणेश शिंदे व गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांच्यासह प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत वेगवान काम केलेले आहे. कोरोनाचे काळात ही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. या कामाचे कौतुक निश्चित शिराळा तालुक्यातील जनता करत आहे.