लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) परिसरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर याचा ताण पडत असून, आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. दिघंचीत दिवसाला २० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. नागरिकांनी आपला व आपल्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून प्राथमिक आरोग्य केंद्रास मदत करावी, असे आवाहन दिघंचीचे सरपंच अमोल मोरे यांनी केले.
माेरे म्हणाले, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे दिघंचीकर आता सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य केंद्रास मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. आतापर्यंत अल मोहम्मदिया मर्कज ट्रस्ट मुस्लिम बांधव, त्याचबरोबर योगेश नष्टे, सोमनाथ पांढरे, वैभव सस्ते, शांताराम यादव यांनी औषधे, सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज आदी वस्तू आरोग्य केंद्रास दिल्या.
माजी सैनिक बापूराव काटकर यांनी दहा हजार रुपये दिले. दिघंची आरोग्य केंद्रात गोळ्या, औषधाचा तुटवडा जाणवू नये, चांगल्या सेवा मिळाव्यात, यासाठी दिघंचीकरांनी हातभार लावावा. मदत केलेल्या सर्व वस्तू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पवार व डॉ. सूरज पवार यांच्याकडे देण्यात येत आहेत.
चौकट
दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. आपण केलेली मदतही गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहे. यासाठी दिघंचीकरांनी आरोग्य केंद्राला वैद्यकीय मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपावी. नवीन आर्दशवत सुरुवात दिघंची गावातून करू.
- अमोल मोरे,
सरपंच, दिघंची
फोटो : अमोल मोरे