जप्त केलेल्या वाहनांची देखरेख व सुरक्षा देण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा, या मागणीचे निवेदन तहसीलदार हणमंत मेत्री यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : येथील अपर तहसील कार्यालयात अवैध गौण खनिज वाहतूकप्रकरणी जप्त केलेल्या वाहनांची देखरेख व सुरक्षा देण्यासाठी रात्रीच्या वेळी कोतवाल आहेत, मात्र या कोतवालांच्या जिवाला वाळू तस्करांकडून धोका आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी जत तालुका कोतवाल संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोळी यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले की, संख अपर तहसील कार्यालयात अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी वाहने जप्त करून लावली आहेत. जप्त केलेल्या वाहनांच्या सुरक्षा व देखरेखीकरिता शासनाच्या १ मेच्या आदेशान्वये दि. १ मे ते ३१ पर्यंत रात्री कोतवाल कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
आदेशाप्रमाणे संख आवारातील वाहनांची देखरेख करण्याकरिता २३ मे रोजी गीरगावचे कोतवाल निवास मल्लेशी मादर, दरीबडचीचे कोतवाल मल्लाप्पा विठोबा कोळी हे कर्तव्य बजावत होते.
कर्तव्य बजावत असताना पहाटे साडेतीन वाजता १० ते १२ अज्ञात इसमांनी वाहनाच्या ठिकाणी प्रवेश करून जेसीबी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडत असताना संबंधित कोतवालांनी अपर तहसीलदार व कार्यालयीन कर्मचारी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर संख येथील स्थानिक कोतवाल कामराज विठ्ठल कोळी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यांनी ८-९ नातेवाइकांना जमवून अपर तहसील कार्यालयाकडे धाव घेतली. जमाव पाहून अज्ञातांनी पळ काढला. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. कोतवालांसोबत पोलीस बंदोबस्त व वरिष्ठ अधिकारी नसल्याने अशा घटना घडू शकतात. त्यामुळे रात्रपाळी कर्मचाऱ्यांचा जीवदेखील जाऊ शकतो.
असा प्रकार भविष्यात होऊ नये याची महसूल विभागाने दखल घेऊन आपल्या स्तरावरून वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचा बंदोबस्त मिळावा, अशी मागणी निवेेदनात केली आहे.
निवेदनावर तालुका अध्यक्ष सुभाष कोळी, कामराज कोळी, मल्लू कोळी, निवास मादर यांच्या सह्या आहेत.