सांगली : जिल्ह्याचा निम्मा भाग कायम दुष्काळी आहे. शिराळ्यासारख्या भागात कधी दुष्काळ पडेल, असे कोणाला वाटलेही नव्हते. पण यंदा त्याठिकाणीही दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्जपुरवठा करावा, असे आवाहन माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी येथे केले. जिल्हा बँकेच्या रूपे डेबिट कार्ड योजनेचा प्रारंभ आणि वितरण जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, रुपे डेबिट कार्डच्या माध्यमातून आधुनिक बँकिंगच्या क्षेत्रात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने दमदार पाऊल टाकले आहे. बँकिंग क्षेत्रात ग्राहकांना अपेक्षित गोष्टी असाव्यात. सध्याचे बँकिंग खूपच सुलभ आणि ग्राहकाभिमुख झाले आहे. मोबाईलच्या एका ‘क्लिक’वर सर्व व्यवहार करता येऊ लागले आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्राला ज्या गोष्टी अपेक्षित आहेत, त्या आत्मसात करून जिल्हा बँकेने आणखी चांगल्या योजना राबवाव्यात. त्यासाठी त्यांनी कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करावी. या समितीच्या माध्यमातून राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँकांच्या योजनांचा, सेवांचा अभ्यास करून, ज्या योजना जिल्हा बँकेला देता येणे शक्य आहे, त्या द्याव्यात. सांगलीची जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम बँक आहे. सातारा जिल्हा बँकेशी स्पर्धा करून त्या बँकेसारखी प्रगतीची पावले टाकावीत. त्यानंतर आणखी चांगल्या जिल्हा बँकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. सरकारचे धोरण सध्या कोणत्याही क्षेत्राला मदत न करण्याचेच आहे. त्यामुळेच विदर्भातील तीन जिल्हा बँका प्रचंड आर्थिक अडचणीत असतानाही, त्यांना शासनाने कोणतीही मदत केलेली नाही. सुदैवाने पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा बँकांची स्थिती अत्यंत चांगली आहे. आहे त्या परिस्थितीत जिल्हा बँकेने अधिक सक्षम होऊन प्रगती साधावी, असे ते म्हणाले. बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील म्हणाले की, सध्या २0 हजार डेबिट कार्डांचे वाटप होणार आहे. भविष्यात एक लाख कार्डे वाटण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. बँकेचे संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून ग्राहकाभिमुख अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या वाढतानाच बँकेच्या नफ्यातही वाढ होत आहे. स्वागत बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. रामदुर्ग यांनी केले, तर बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक, प्रा. शिकंदर जमादार, बी. के. पाटील, विक्रम सावंत आदी संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रेमाने सांगितले आणि अपहारातील पैसे मिळाले!बँकेच्या कारभाराचा आढावा घेताना दिलीपतात्या पाटील यांनी, मणेराजुरीतील अपहाराच्या घटनेचा उल्लेख केला. माझ्या कालावधित मणेराजुरीची ही एकच घटना घडली. तरीही ज्याने अपहार केला, त्याला माझ्या केबिनमध्ये बोलावले आणि त्याला प्रेमाने पैसे भरण्यास सांगितले. माझी प्रेमाची भाषा त्याला कळाली आणि त्याने ९ लाख २0 हजार रुपयांऐवजी ९ लाख ८५ हजार रुपये भरले. दिलीपतात्यांच्या या वाक्यावर उपस्थितांत हशा पिकला. बँकिंग क्षेत्रात कर्मचाऱ्यांची तत्परता अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे सध्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे. नवी भरती करताना बँकिंग क्षेत्रातील ज्ञान, कार्यतत्परता आणि कार्यक्षमता या कसोटीवर उतरणारेच कर्मचारी घ्यावेत, अशी सूचना पाटील यांनी यावेळी केली.
दुष्काळी तालुक्यांना प्राधान्याने कर्जपुरवठा करा
By admin | Published: December 29, 2015 11:29 PM