सांगली : अपर तहसिल कार्यालय संख येथे अनाधिकृत वाळू वाहतुकीवर कारवाई करताना आढळलेल्या वाहनामधील अनाधिकृत वाळू जप्त करून अपर तहसिल कार्यालय संखच्या आवारात 25 ब्रास व पोलीस ठाणे उमदी च्या आवारात 5 ब्रास वाळू साठा असा एकूण 30 ब्रास वाळू साठा ठेवण्यात आलेला आहे. या वाळूचा जाहीर लिलाव दिनांक 17 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता अपर तहसिल कार्यालय संख ईरीगेशन कॉलनी संख येथे बोली पध्दतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी जत प्रशांत आवटे यांनी दिली.जप्त केलेल्या वाळु साठ्याचा लिलाव करण्यासाठी हातची मुळ किंमत (अपसेट प्राईज) 5 हजार 729 रूपये प्रति ब्रास प्रमाणे मान्यता देण्यात आली आहे. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याकरिता हातच्या मुळ किंमतीच्या 20 टक्के अनामत रक्कम म्हणजेच अर्जदार यांनी अपर तहसिल कार्यालय संख च्या आवारातील 25 ब्रास वाळू साठा लिलावात भाग घेण्याकरिता 28 हजार 645 रूपये एवढी अनामत रक्कम व उमदी पोलीस ठाण्याच्या आवारातील 5 ब्रास वाळू साठा लिलावात भाग घेण्याकरिता 5 हजार 729 एवढ्या अनामत रक्कमेचा धनादेश लिलाव प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जमा करावयाचा आहे.वाळू लिलावाच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. वाळूची निश्चित करण्यात आलेल्या अपसेट किंमतीपेक्षा अधिक बोलीने लिलावास सुरूवात करण्यात येईल. लिलावाने द्यावयाची वाळू दर्शविले ठिकाणी आहे अगर कसे याची खात्री करून घेण्याची जबाबदारी संबंधित लिलावधारकाची राहील. लिलावामध्ये भाग घेणाऱ्या लिलाव धारकाने महत्तम बोली पैकी ळ् रक्कम त्याच दिवशी शासकीय कोषागारात भरण्याची आहे. उर्वरित रक्कम तीन दिवसाच्या आत भरण्याची आहे.
लिलावात महत्तम बोलीची संपूर्ण रक्कम जमा केल्यानंतर वाळूचा ताबा देण्यात येईल. लिलावातील वाळू उचलण्यासाठी वाहनाचा खर्च लिलावधारकांनी स्वत: करण्याचा आहे. लिलाव धारकाने वाळू लिलावाच्या एकूण रक्कमेच्या 10 टक्के जिल्हा गौण खनिज प्रतिष्ठान निधी सांगली यांच्या खाती भरणे बंधनकारक असल्याचे जत उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांनी कळविले आहे.