आष्टा : शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शुक्रवार, दि. ७ ते शनिवार, दि. १५ अखेर आठ दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, अशी माहिती आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांनी दिली.
आष्टा नगरपरिषदेच्या काकासाहेब शिंदे सभागृहात आयोजित बैठकीत शिंदे बोलत होते. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, पोलीस निरीक्षक अजय सिद उपस्थित होते.
वैभव शिंदे म्हणाले, आष्टा शहरातील अण्णासाहेब डांगे कोविड सेंटर, स्पंदन हॉस्पिटल, आष्टा क्रिटीकेअर, कृष्णामाई हॉस्पिटल यासह ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जनता कर्फ्यू करणे गरजेचे होते. तहसीलदार दीक्षांत देशपांडे म्हणाले, शहरात २०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. शहरातील जनतेकडून जनता कर्फ्यू लागू करण्यात यावा, अशा सूचना येत होत्या. त्यामुळे कोराेनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक अजित सिद, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, झुंजारराव पाटील, विराज शिंदे, वीर कुदळे, अर्जुन माने, डॉ. सतीश बापट, बाळासाहेब इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
चौकट :
ईदचा खर्च मु्ख्यमंत्री सहायता निधीसाठी
माजी नगरसेवक शकील मुजावर यांनी ईदसाठी येणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे देण्याचे जाहीर केले. नगरसेवक अर्जुन माने यांनीही युवक नेते प्रतीक पाटील यांच्या आवाहनानुसार मी व माझ्या सोबत मित्रांचे पाच हजार रुपये कोरोना लसीकरणासाठी देणार असल्याचे सांगितले.
फोटो : ०४ आष्टा १
ओळ : आष्टा नगरपरिषदेच्या काकासाहेब शिंदे सभागृहात जनता कर्फ्यूबाबत बोलताना वैभव शिंदे, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, पोलीस निरीक्षक अजित सिद, स्नेहा माळी, विराज शिंदे.