कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये मंगळवारपासून आठ दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंगळवार, दि. ४ मे ते ११ मे अखेर जनता कर्फ्यू असणार आहे. औषध दुकाने, रुग्णालये, दूध डेअरी यांना मर्यादित वेळेत सुरू ठेवण्यास मुभा असून, इतर सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. विनामास्क, विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
भाजीपाला व अन्य व्यवसाय पूर्णपणे आठ दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. कवठे एकंद येथे सोमवारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६० असून, २७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जनता कर्फ्यूला सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच राजेंद्र शिरोटे यांनी केले आहे.
यावेळी सरपंच राजेंद्र शिरोटे, तलाठी सचिन इंगोले, ग्रामविकास अधिकारी पी.टी. जाधव, उपसरपंच शर्मिला घाईल, पोलीस पाटील वैभव पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.