‘मिले कदम, जुडे वतन’चे राहुल गांधींच्या हस्ते प्रकाशन, पृथ्वीराज पाटलांची संकल्पनेचे केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 03:31 PM2022-11-23T15:31:51+5:302022-11-23T15:33:34+5:30
राहुल गांधी यांनी या संपूर्ण दौऱ्यात स्वीकारलेल्या निवडक सत्कारात व कार्यक्रमात या कॉफी टेबल बुकचा समावेश केला.
सांगली : शेगाव येथे झालेल्या भारत जोडो यात्रेच्या सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी साकारलेल्या ‘मिले कदम, जुडे वतन’ या भारत जोडो यात्रेतील कन्याकुमारी ते हिंगोली प्रवास चित्रबद्ध करणाऱ्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन केले.
यावेळी संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेशसिंह बघेल, खासदार मुकुल वासनिक, खासदार जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम व सतेज पाटील, आमदार राजेश टोपे, आमदार विक्रमसिंह सावंत उपस्थित होते.
राहुल गांधींची भारत जोडो पदयात्रा ऐतिहासिक घटना असून, त्याचे विविध प्रकारे दस्तावजीकरण झाले पाहिजे, या भावनेतून पृथ्वीराज पाटील यांनी हे कॉफीटेबल बुक साकार केले आहे. यामध्ये कन्याकुमारी ते हिंगोली यात्रेतील निवडक क्षणचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये राहुल गांधी यांची भावनिक, विविध समूहांबरोबरची, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतानाची छायाचित्रे आदींचा समावेश आहे. त्यांना साजेसे ऐतिहासिक उद्गार, राष्ट्रपुरुषांची प्रसिद्ध वाक्ये यात आहेत.
पृथ्वीराज पाटील यांच्या या अनोख्या उपक्रमाचे काँग्रेस च्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी स्वागत केले. स्वतः राहुल गांधी यांनी जवळपास पाच मिनिटे विशेष वेळ देऊन हे कॉफी टेबल बुक नजरेखालून घातले. राहुल गांधी यांनी या संपूर्ण दौऱ्यात स्वीकारलेल्या निवडक सत्कारात व कार्यक्रमात या कॉफी टेबल बुकचा समावेश केला. काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांनीदेखील हे कॉफी टेबल बुक हे भारत जोडो यात्रेच्या इतिहासाची नोंद करणारा महत्त्वाचा दस्त ऐवज आहे, अशी भूमिका मांडली.