दिघंची : आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी-दिघंची राज्यमार्ग ते इटकी हद्दीपर्यंत रस्ता पूर्णत्वाकडे आला आहे. या रस्त्यासाठी सरपंच अनिता होनमाने यांनी पाठपुरावा केला. आ. अनिल बाबर व शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील याच्या माध्यमातून रस्त्याला मंजुरी मिळाली असून या रस्त्याचे काम जलदगतीने सुरू आहे.
पुजारवाडीहून दिघंचीकडे येणारा हा एकमेव मार्ग असल्याने या रस्त्याने नेहमीच वर्दळ असते. सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची असणारी आटपाडी-दडसवाडी ही बस याच रस्त्याने धावते. तसेच शालेय विद्यार्थी, दुग्ध व्यवसायिक, या रस्त्याने ये-जा करतात. याशिवाय परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणात असल्याने या मार्गावरून ऊस वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. रस्त्यावर खड्डे पडल्याने या सर्व घटकांचा याचा त्रास होत होता.
आता रस्त्याचे काम होत असल्याने दिघंचीहून अकलूजकडे जाण्यासाठी हा जवळचा व सोयीचा मार्ग बनला आहे. तर दिघंची, पुजारवाडी, इटकी, बचेरी, पिलीव या मार्गे अकलूजला जाण्यासाठी सुमारे २० किलोमीटर अंतर वाचणार आहे. या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने व रस्त्याचे काम जलदगतीने सुरू असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
चौकट:
राज्य मार्ग १५३ ते पुजारवाडी दिघंची हा मार्ग खड्डेमय झाला होता. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत होता. याचा त्रास शालेय विद्यार्थी दुग्ध व्यावसायिक यांना सहन करावा लागत होता. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे, तर अकलूजला जाण्यासाठी जवळचा व चांगला मार्ग बनला आहे.
चैत्राली मिसाळ, उपसरपंच, पुजारवाडी दिघंची
फोटो ओळी: पुजारवाडी दिघंची ते राज्य मार्ग १५३ या रस्त्याची पाहणी करताना तानाजीराव पाटील, युवा नेते ब्रह्मदेव होनमाने, संतोष पाटील, मनोज नांगरे व अन्य.