सांगली : देशामध्ये पोलिओवर मात करण्यात आज आपण यशस्वी झालो असलो तरी आपल्या देशातून पोलिओला कायमचे हद्दपार करण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा सर्व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी येथे केले.राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दि. 10 मार्च 2019 रोजी राबवली जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, निवासी वैद्यकीय अधिकारी शहानवाज नाईकवडी, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. एम. एम. चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. जे. जोशी आदि उपस्थित होते.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख म्हणाले, पोलिओ रोगाचा सर्वाधिक धोका बालकांना असतो. त्याच्यावर उपचार नसून प्रतिबंध हाच उपचार आहे. केवळ शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीच्या ठराविक अंतराने दोन लसी दिल्यास पोलिओची बाधा होण्याची शक्यता उरत नाही.
तसेच, भावी पिढ्यांवर पोलिओमुळे उद्भवणारे अपंगत्वाचे सावट कधीही पडणार नाही. या व्यापक दृष्टीकोनातून पोलिओ निर्मूलनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तरी याचा लाभ शून्य ते पाच वर्षे वयोगटाखालील बालकांना मिळावा, यासाठी पालकांनी सजग राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख म्हणाले, सांगली जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात एकूण 2 लाख, 2 हजार 923 बालके शून्य ते 5 वर्षे वयोगटाखालील आहेत. त्यांच्यासाठी ग्रामीण भागात 1 हजार 290 आणि शहरी भागात 83 अशी एकूण 1 हजार 373 लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
त्यासाठी बुथ कर्मचारी, बुथ पर्यवेक्षक, भेट द्यावयाची घरे, गृह भेट टीम, गृहभेट पर्यवेक्षक, ट्रान्झिट टीम, मोबाईल टीम, आवश्यक साधनसामग्री, वाहतूक व्यवस्था आदि बाबींची तयारी सुरू आहे. तसेच, याबाबत जनजागृती करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, आरोग्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.