आर. एन. बुरांडे --पलूस निसर्गाकडून सधनतेची देणगी लाभलेला पलूस तालुका हा केवळ ३४ गावांचा. एक-दोन गावे वगळता सर्व गावे समृद्धीचे जीवन जगत आहेत. शेती आणि उद्योजकतेच्या गुणवत्तेमुळे तालुका दरडोई उत्पन्नात राज्यात अव्वल आहे. अशा या समृद्ध आणि शांत असणाऱ्या पलूस तालुक्याला अलीकडे भ्रष्टाचाराचा कलंक लागला असून, तालुक्याला लागलेले हे भ्रष्टाचाराचे ग्रहण लवकर सुटावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य लोक करीत आहेत.पलूसमधील पंचायत समितीतील विविध खाती, मध्यवर्ती इमारतीतील विविध विभाग, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण अशा सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात कमी-अधिक प्रमाणात भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झाल्याची चर्चा जोर धरत आहे. तालुक्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदारांच्या साहाय्याने सापळे रचून अनेकांना जेरबंद केले. पण हे केवळ हिमनगाचे टोक असावे, असेच म्हणावे लागेल. या सर्व कार्यालयांतून संबंधितांना चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही, असा अनुभव येत असल्याची नेहमीचीच चर्चा आहे. सहज होत असलेल्या कामात विनाकारण अडवणूक करुन चिरीमिरी घेतली जाते.पलूस पोलिस ठाणे हे सांगली जिल्ह्यातील एक निर्मळ असा नावलौकिक असणारे पोलिस ठाणे. परंतु येथील तीन पोलिस कर्मचारी पलूसमधील एका वाईन शॉप मालकाकडून ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला रंगेहात सापडले. यामध्ये एक सहायक पोलिस फौजदार भगवान मोरे, पोलिस नाईक महेश भिलवडे आणि शिपाई मोहन चव्हाण हे पोलिस कर्मचारी होते. ही सांगली जिल्ह्यातील मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते. परिणामी पलूस पोलिस ठाणे प्रथमच कलंकित झाले.सहा महिन्यांपूर्वी पलूस पंचायत समितीकडील कृषी अधिकारी नंदकुमार चव्हाण आणि मनरेगा विभागाकडील तांत्रिक सहायक असणाऱ्या वैजयंता पाटोळे यांना, जनावरांच्या गोठ्याचे प्रकरण मंजूर करण्यासाठी सामान्य शेतकऱ्यांकडून ५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते.त्यामुळे पंचायत समितीला प्रथमच हादरा बसला होता. यातून समिती सावरेल, असे वाटत असतानाच, समितीकडील वरिष्ठ लिपिक सुरेंद्र कोरे यांना, अपंग वसंत घरकुल योजनेचा अंतिम हप्त्याचा धनादेश लाभार्थीला देण्यासाठी सातशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. वास्तविक या योजनेतील लाभार्थींच्या हप्त्याची रक्कम लाभार्थींच्या खात्यात आॅनलाईन जमा करण्याचे बंधन असताना, सुरेंद्र कोरे हे लाभार्थींना धनादेशाने रक्कम अदा करीत होते. ही बाब तालुक्याचे गटविकास अधिकारी, तसेच इतर वरिष्ठांना माहीत नव्हते काय? अशी चर्चा जनता करीत आहे. लाचखोरीचे प्रकार वाढल्याने पलूस तालुका बदनाम होत आहे. लाचखोर मुजोर : चाप लावण्याची गरजपलूस तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील लोकसेवकांनी आता सावध होऊन सर्वसामान्यांकडून कामासाठी दाम घेण्याचे टाळावे. तसेच नागरिकांनी आपले अवैध धंदे वैध करण्यासाठी लाच देण्याचे बंद करावे. जिल्ह्याचे लाचलुचपत प्रतिबंधक उपअधीक्षक प्रदीप आफळे यांनी पलूसमधील भ्रष्टाचाराला चाप लावला आहे. तरीसुद्धा संबंधित कार्यालयात याबाबत चांगलीच साफसफाई झाली पाहिजे, अशी मागणी पलूसमधील नागरिक करीत आहेत. लाचेच्या घटनांनी पलूस होतोय बदनामकाही दिवसांपूर्वी पलूस महावितरणचा आंधळी येथील विद्युत कर्मचारी शंकर शिंदे हा तक्रारदाराच्या घरातील तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सापडला. अशा लाचखोरीला वेळीच रोखण्याची गरज आहे.
पलूस तालुक्याला भ्रष्टाचाराचे ग्रहण
By admin | Published: March 22, 2016 12:53 AM