सांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांना अवघ्या १५ दिवसांतच विश्रांती घ्यावी लागली आहे. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी नसल्याने उपसा थांबविण्यात आला आहे. पंधरा दिवस पंप फिरविल्याने वीजबिलाचा नाहक भुर्दंड कृष्णा खोरे महामंडळाला सोसावा लागणार आहे.१७ जानेवारीस जलसंपदा विभागाच्या बैठकीत योजना सुरु करण्याचे आदेश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले होते. अधिकाऱ्यांनीही पाण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी प्राप्त झाल्याचे सांगितले होते. २० जानेवारीरोजी पंप सुरु करण्यात आले. पण अवघे १५ दिवसच सुरु राहिले. ३ फेब्रुवारीस विश्रांती देण्यात आली. या कालावधीत कृष्णेचे पाणी सलगरेत पाचव्या टप्प्यापलीकडेही जाऊ शकले नाही. अधिकाऱ्यांचे नियोजन जतपर्यंत पाणी नेण्याचे होते, पण मिरज तालुक्याची सीमाही ओलांडता आली नाही. पाणी कालव्यातून वाहत राहिले, शेतकऱ्यांनी मात्र उपसा केला नाही. जत तालुक्यातूनही मागणी अर्ज आले नाहीत. प्रशासनाने वेगवेगळ्या ग्रामपंचायतींत मागणी अर्ज घेण्याची सोय केली होती. पण शेतकरी फिरकले नाहीत.सध्या थंडी अद्याप कायम असल्याने विहिरी व कुपनलिकांतील पाणीसाठे टिकून आहेत. ऊसतोड व द्राक्ष उतरण सुरु आहे. त्यामुळे पाण्याची गरज नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.दरम्यान, सलगरे येथे योजनेच्या पाचव्या पंपगृहात विद्युत पॅनलचे काम सुरु करण्यात आले आहे. संपूर्ण पॅनल बदलण्यात येणार आहे. थकबाकी ९८ कोटींवर म्हैसाळ योजनेची गेल्या आवर्तनासह एकूण थकीत पाणीपट्टी ९७ कोटी ७४ लाखांवर पोहोचली आहे. शासन निर्णयानुसार पाणीपट्टीपैकी ८१ टक्के हिस्सा शासन भरते, तर फक्त १९ टक्के पैसे शेतकऱ्याने भरायचे आहेत. तरीही पैसे भरण्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या आवर्तनासाठी जलसंपदा विभागाने २३ हजार ४९४ रुपये प्रतिदशलक्ष घनफूट इतकी पाणीपट्टी निश्चित केली आहे.
Sangli News: म्हैसाळ योजनेच्या पंपांना अवघ्या १५ दिवसांतच विश्रांती, वीजबिलाचा नाहक भुर्दंड सोसावा लागणार
By संतोष भिसे | Published: February 06, 2023 5:21 PM