मांजर्डे : तासगाव पूर्व भागासाठी उभारलेल्या विसापूर-पुणदी योजनेपैकी पुणदी उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे, तर विसापूर योजना तात्पुरती बंद राहणार आहे. सध्या आवश्यक पाणी उपलब्ध नसल्यामुळे योजना पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य नाही. यामुळे कमी क्षमतेने आवर्तन सुरू करण्यात आले आहे. पुणदीचे पाणी सुरू झाल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त हाेत आहे, तर विसापूर योजना बंद असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
तासगाव पूर्व भागाला शेतीच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी विसापूर-पुणदी उपसा योजना तयार करण्यात आली. मागील एक महिन्यापासून विसापूर योजना सुरू होती. मात्र, पुणदी उपसा योजना बंद होती. त्यामुळे कार्यक्षेत्रातील गावांमध्ये शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती.
या योजनेवरील अनेक गावच्या शेतकऱ्यांनी आवश्यक पाणीपट्टी भरूनही योजना सुरू झाली नव्हती. आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे योजना सुरू करण्यात आली नव्हती.
अखेर बुधवारी या योजनेचा एक पंप सुरू करण्यात आला. पाण्याअभावी अन्य पंप बंद आहेत.
चाैकट
विसापूर योजना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी
मागील एक महिन्यापासून सुरू असणारी विसापूर उपसा योजना बंद करण्यात आली आहे. पुणदी योजनेसाठी ही योजना तात्पुरती बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची मागणी असताना आवश्यक पाणीपट्टी भरली असताना योजना बंद केल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. अपुऱ्या पाण्याअभावी योजना बंद करण्यापेक्षा आवश्यक पाणी उपलब्ध करून दोन्ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू करून पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.