सावंतपूर : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना आदेश दिले आहेत.
पलूस तालुक्यासह जिल्ह्यात रविवारी व सोमवारी रात्री वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. दुधोंडी व इतर काही गावांत सोमवारी गारांसह पाऊस झाला. या वादळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केळी, ऊस, मका, फुले, भाजीपाला अशा पिकांचे नुकसान झाले आहे.
नुकतीच खरड छाटणी होऊन नवीन फुटी आलेल्या द्राक्षबागांतील काड्या मोडून गेल्या आहेत. वादळी वारा आणि पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे त्वरित करण्याच्या सूचना मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.