सांगली: पुणे येथे 'निर्भय बनो' असे जनतेला आवाहन करणाऱ्या सभेला जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नियोजन करून जीवघेणा हल्ला केला. या फॅसिस्ट हिंस्र हल्ल्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा कार्यकारिणीतर्फे तीव्र निषेध करत आहे. तसेच याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे राज्य कार्यकारिणी सदस्य उमेश देशमुख यांनी केली.
उमेश देशमुख म्हणाले, भाजपच्या पुण्यातील नेत्यांनी संविधानाचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्राचे प्रशासन आणि पोलिस खात्याला उघड आव्हान दिले होते.
लोकशाही अधिकार बजावणाऱ्या नागरिकांना निर्भयतेने आपले कर्तव्य पार पाडण्यास संविधानाचे कवच पुरवले पाहिजे. या बाबतीत प्रशासन आणि पोलिस खात्यातील जबाबदार अधिकाऱ्यांनी केवळ कामचुकारपणा केलेला नाही तर या खुनी हल्ल्यास आपल्या वर्तनाने साह्य केले आहे. या तिघांवर ठिकठिकाणी हल्ले करायचे नियोजन भाजपच्या गुंडांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे. या बाबतीत पोलिसांची भूमिका उघडपणे पक्षपाती होती, हेही दिसून आले आहे. राज्यातील जनतेला निर्भयपणे आपले लोकशाही व्यवहार पाळता यावेत, याची अंतिम जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांची आहे. ती जबाबदारी पार पाडायच्या ऐवजी गाडीखालील श्वानाचा दाखला देत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांची पाठराखण केली आहे. राज्यातील गोळीबारांच्या घटनांच्या पाठोपाठ पुण्यातील हल्ला हे राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णतः कोलमडल्याचे लक्षण तर आहेच. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची हत्या भाजपाच्या आशीर्वादाने होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मागण्या
- -खुनाचा आणि सामाजिक अशांतता पसरवण्याचा कट करून तो अंमलात आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करा
- -कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि गुन्हेगारांना साथ देणाऱ्या पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा
- -गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे.