सांगली- पुणे-बंगळुरू या आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाचा फटका गुरुवारी सायंकाळी या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनांना बसला. आटके ता. कराड फाट्यावरील सेवारस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे याठिकाणी सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती.
पूर्वेला आटके फाटा व पश्चिमेला नारायणवाडी फाटा असून याठिकाणी जुन्या उड्डाणपुलाच्या रुंदिकरणाचे काम सुरू असल्याने पुणेच्या व कोल्हापूरच्या दिशेने जाणारी सर्व वाहने सेवा रस्त्यावरून जात असून या सेवा रस्त्यावर आज पडलेल्या मोठ्या पावसाने पाणी जमा झाल्याने याठिकाणी बराच वेळ वाहतूकीची कोंडी झाली होती,पुणे, कराड, सातारा बाजूकडून कोल्हापुरच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांचे या वाहतूक कोंडीमुळे हाल झाले.
आटके फाटा येथील सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे याठिकानाहून प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांना व पादचाऱ्यांना रस्त्यावर उतरून पाण्यातून चालत बाहेर जावे लागले, या पाण्यात दुचाकी कार व रिक्षा इंजिन मध्ये पाणी जावून बंद पडल्या होत्या, स्थानिक गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना याचा फटका बसला.याशिवाय वाठार जवळील सेवा रस्त्यावर,पेठनाका सेवा रस्त्यावर व उड्डाणपुलाच्या खाली देखील मोठ्या प्रमाणात पाणी जमा होवून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.