मिरज :
पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गावर गेली दोन वर्षे बंद असलेल्या चार पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेला निर्देश दिल्याने पुणे-कोल्हापूर, कोल्हापूर-पुणे, मिरज-कोल्हापूर, सांगली-कोल्हापूर या पॅसेंजर रेल्वे गाड्या आठवडाभरात सुरू होण्याची शक्यता आहे.
कोरोना साथीमुळे मार्च २०२० पासून रेल्वेने पॅसेंजर गाड्या बंद केल्या आहेत. सर्व एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात झाल्या आहेत. मात्र या गाड्यांतून प्रवासासाठी आरक्षित तिकीट आवश्यक असल्याने मिरजेतून कोल्हापूर, सातारा व पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरु आहेत. यामुळे पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आता कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गावरील बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे सुरु करण्यास रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली आहे.
आठवडाभरात मिरज व कोल्हापुरातून चार पॅसेंजर गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे. पॅसेंजर गाड्या सुरू झाल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.