सांगली : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या पुणे-मिरज आणि मिरज-फोंडा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या जानेवारीपासून प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेस सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, लवकरच सुरू होणाऱ्या विजापूर-पंढरपूर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षण प्रक्रियेत बदल करून या मार्गाचे उमदीजवळून सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार पाटील म्हणाले की, मिरज-पुणे रेल्वेमार्गावर गाड्यांची संख्या वाढत असल्याने आणि त्यामुळे प्रवासास विलंब होत असल्याने या मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. दुहेरीकरणासाठी केंद्र शासनाने सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असून, या मार्गाच्या दुहेरीकरणास प्रत्यक्ष सुरु वात होणार आहे. येत्या दोन महिन्यांत या मार्गाच्या कामांची निविदा प्रक्रिया राबवून कामास सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर प्रस्तावित विजापूर-पंढरपूर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासही शासनाने मंजुरी दिली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी या मार्गाचे इंडीजवळून सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली होती. मात्र, यापेक्षा हा रेल्वेमार्ग उमदी (ता. जत) येथून गेल्यास अंतर कमी होणार असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आता उमदीजवळून मार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाल्याने भविष्यात उमदी परिसरात रेल्वे पोहोचणार आहे. वारणाली आणि दह्यारी येथील उड्डाणपुलाच्या कामाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील पाणी योजनांच्या थकबाकीबाबत खासदार पाटील म्हणाले की, थकबाकीमुळे जिल्ह्यातील म्हैसाळ योजना अडचणीत सापडली असून, शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन थकबाकी वसुलीस प्रतिसाद देणे आवश्यक आहे. योजनेची १० कोटी ४१ लाखांची थकबाकी असल्याने वीज बिल भरल्याशिवाय योजना चालविणे कठीण आहे. योजनेच्या कार्यक्षेत्रातील वसंतदादा पाटील कारखाना (सांगली), मोहनराव शिंदे साखर कारखाना (आरग), अथणी शुगर (कें पवाड), महांकाली कारखाना (कवठेमहांकाळ) आणि राजारामबापू कारखान्याचे जत युनिट या साखर कारखान्यांशी योजनेच्या थकबाकीबाबत चर्चा झाली असून, त्यांनी थकबाकी वसुलीस प्रतिसाद देण्यास तयारी दर्शविली आहे.
पुणे-मिरज रेल्वेमार्ग दुहेरीकरण जानेवारीपासून
By admin | Published: December 06, 2015 12:36 AM