सांगली : शहरातील मुख्य बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका महिलेची पर्स चोरट्याने लंपास केली. ही घटना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. या पर्समध्ये एक लाखाचा सोन्याचा ऐवज होता. याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याप्रकरणी कमल विश्वासराव देशमुख (वय ५८, रा. पुणे) यांनी फिर्याद दिली. देशमुख पुण्यात राहतात. कवठेमहांकाळ येथे त्यांचे माहेर आहे. काही दिवसांपूर्वी त्या माहेरी आल्या होत्या.
शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास त्या पुन्हा पुण्याला निघाल्या होत्या. त्यासाठी त्या सांगली बसस्थानकावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पर्समध्ये मंगळसूत्र, कानातले व नेकलेस असे एक लाख चार हजार रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवले होते. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ही पर्स लंपास केली. देशमुख या पुण्यात पोहोचल्यानंतर त्यांना पर्स नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी शोधाशोध केली. चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत बसस्थानक परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत.