आटपाडी : आटपाडी न्यायालयाने पुणे येथील योगेश अंकुश पवार याला खोटा धनादेश दिल्याप्रकरणी न्यायाधीश विनायक पाटील यांनी सहा महिने तुरुंगवास व दोन लाख चाळीस हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली.
आटपाडी येथील सतीश चिंतू लांडगे यांच्याकडून योगेश अंकुश पवार (रा. आंबेगाव पठार, पुणे) याने मे २०१५ मध्ये उसनवार एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये घेतले होते. दरम्यान, यावेळी योगेश पवार याने सतीश लांडगे यास घेतलेल्या रक्कम परतफेडपोटी धनादेश दिला होता. हा धनादेश वटला नसल्याने सतीश लांडगे यांनी यांनी ॲड. चेतन जाधव यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला हाेता.
सोमवारी या दाव्याचा निकाल लागला असून योगेश पवार यास खोटा धनादेश दिल्याप्रकरणी दोन लाख चाळीस हजार रुपये दंड व सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती ॲड. चेतन जाधव यांनी दिली.