इस्लामपूर : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे शेतजमीन व्यवहार आणि थकीत वीज बिलाच्या कारणातून १२ वर्षांपूर्वी दोन कुटुंबात हाणामारी होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला होता. या खटल्याच्या सुनावणीत तुम्ही साक्ष देऊ नका, असे महिलांना धमकावून दगडाने मारहाण केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी चौघांना शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या २६ हजार रकमेपैकी २० हजार रुपये जखमी फिर्यादीस देण्याचे आदेश दिले.
संदीप नारायण थोरात याला ३ महिने सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास २ महिने साधी कैद अशी शिक्षा दिली, तर नारायण शिवाजी थोरात, हणमंत शिवाजी थोरात आणि विक्रम हणमंत थोरात या तिघांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि प्रत्येकी ७ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास ४ महिने साधी कैद अशी शिक्षा दिली. यातील जखमी फिर्यादी सोनाली प्रकाश थोरात यांना २० हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून मिळणार आहेत.
थोरात कुटुंबात जमीन व्यवहार आणि थकीत वीज बिलावरून २००८ मध्ये मारामारी झाली होती. त्यामध्ये प्रकाश थोरात यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यावरून वरील चौघांविरुद्ध खटला सुरू होता. या खटल्यात मृत प्रकाश यांच्या पत्नी आणि दोन मुलींची साक्ष होणार होती. २३ जानेवारी २०१४ रोजी रात्री सोनाली ही बहिणीच्या मुलास घेऊन अंगणात बसली होती. त्यावेळी चौघांनी तेथे येऊन उद्या तुम्ही साक्ष द्यायला जायचे नाही, साक्ष दिली तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच संदीप याने सोनालीस दगडाने मारहाण करून तिला जखमी केले होते.
सरकारी वकील रणजित पाटील यांनी ५ साक्षीदार तपासले. त्यातील फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपास अधिकारी यांच्या साक्षी ग्राह्य मानत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
अधिकारी, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे आणि महिला पोलीस एस. एस. निकम यांनी सरकार पक्षाला खटल्याच्या कामकाजात सहकार्य केले.
फोटो-