तक्रारदार ट्रॅक्टर व ट्रॉली रस्त्याच्या कामासाठी घेऊन जात असताना, देशिंगचा मंडल अधिकारी बाळकृष्ण नागरगोजे याने पकडला होता. ट्रॅक्टर वाळू भरण्यासाठी निघाला असल्याने कारवाई करतो, असे नागरगोजेने धमकावले. त्यावेळी प्रशांत पाटील याने मध्यस्थी करून तक्रारदाराकडे नागरगोजेसाठी सव्वा लाखाच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी ८८ हजार त्याने तक्रारदाराकडून स्वीकारले होते. त्यानंतर नागरगोजेने हा ट्रॅक्टर सोडून दिला. प्रशांत पाटील याने तक्रारदारास उर्वरित ३७ हजार रुपये आणून देण्यास सांगितले. याबाबत सोमवारी (दि. १ मार्च) तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
या तक्रारीनुसार मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिरज-पंढरपूर रस्त्यावर सापळा रचला होता. या रस्त्यावरील त्र्यंबक नाष्टा सेंटर येथे प्रशांत पाटील आला. त्याने उर्वरित ३७ हजारांची मागणी केली. त्यावर ३० हजार देण्याचे ठरले. ती रक्कम स्वीकारताच पाटीलला रंगेहात पकडण्यात आले.
प्रशांत पाटीलवर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने कवठेमहांकाळ महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहेत.
लाचलुचपत विभागाचे उपायुक्त राजेश बनसोडे, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक प्रशांत चौगुले, गुरुदत्त मोरे, सलीम मकानदार, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, संजय सपकाळ, संजय कलकुटगी, अविनाश सागर, राधिका मोने यांनी ही कारवाई केली.