लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी कोट्यवधीची गुंतवणूक करून आरोग्य सेवा देऊ केल्या आहेत. मात्र या डॉक्टरांमध्ये गळेकापू व्यावसायिक स्पर्धा सुरू आहे. काहीजण एकमेकांवर कुरघोड्या करण्यात व्यस्त असल्याने रुग्णसेवेला बगल दिली जात असून, रुग्णांची पळवापळवी सुरू आहे.
बसस्थानक परिसरात अनेक रुग्णालये उभी राहिली आहेत. त्यातील काही जणांचे ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यावसायिकांशी संधान आहे. या रुग्णालयांत रुग्ण पाठवण्याच्या बदल्यात संबंधित डॉक्टरला कमिशन दिले जात असल्याचे बोलले जाते. वर्षभरापासून खासगी रुग्णालयांना कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे. पहिल्या लाटेत बहुतांशी डॉक्टर कोविड सेंटर सुरू करण्यासाठी इच्छुक नव्हते. अनेकांनी विरोध दर्शविला होता. परंतु, शासनाच्या दबावामुळे त्यांना कोविड सेंटर चालवावे लागले. त्यातून मिळणारे उत्पन्न पाहता दुसऱ्या लाटेत मात्र कोविड सेंटर मिळविण्यासाठी डॉक्टरांमध्ये स्पर्धा सुरू झाली. मात्र काही रुग्णालयांत आवश्यक आरोग्य सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा टक्का वाढला. कोविड सेंटर चालविणारे डॉक्टरच त्याला जबाबदार आहेत.
बहुतांशी कोविड सेंटरमधील मुख्य डॉक्टर दोन-दोन दिवस रुग्णालयाकडे फिरकले नसल्याच्या तक्रारी आहेत. ते घरात बसूनच शिकाऊ डॉक्टरांकडून उपचार करवून घेत होते. त्यांच्याविरोधात वेळोवेळी तक्रारी झाल्या. परंतु, त्याकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले. बसस्थानक परिसरातील डॉक्टरांमध्ये गळेकापू स्पर्धा असल्याने एकमेकांवर कुरघोड्या करून रुग्ण पळविण्याचा उद्योग आता तेजीत सुरू आहे.
चौकट
शासकीय रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा
इस्लामपुरात उपजिल्हा रुग्णालय आहे. तेथे कोविड सेंटर सुरू आहे. अत्याधुनिक सुविधा आहेत, परंतु तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा कमी आहे. त्यामुळे रुग्ण खासगी रुग्णालयाकडे जातात.
चाैकट
अति तिथे माती
मृतदेह दोन दिवस ठेवून घेऊन त्यावर उपचार केल्याचे दाखवून बिल उकळल्याप्रकरणी डॉ. योगेश वाठारकर यांना अटक झाल्यानंतर शहरातील काही डॉक्टरांनी ‘अति तिथे माती’ अशी प्रतिक्रिया दिली. मृत्यू झाल्यानंतर खाटेवर दोन दिवस मृतदेह राहू शकतो का, याबाबतही उलट-सुलट चर्चा होत आहे. शहरातील काही डॉक्टर इंडियन मेडिकल असोसिएशनला जुमानत नाहीत. स्वत:च्या हिमतीवर आम्ही व्यवसाय करतो, असे सांगतात.