सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने व्हेंटिलेटर्स खरेदी आणि ऑक्सिजननिर्मिती प्लांट उभारणीला स्थायी समिती सभेत शुक्रवारी मान्यता देण्यात आल्याचे सभापती पांडुरंग कोरे यांनी सांगितले.
स्थायी समितीची सभा शुक्रवारी पालिका सभागृहात झाली. सभेत कोरोना उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. नगरसेविका सविता मदने यांनी शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली, तसेच स्थायी सदस्यांनी ऑक्सिजनची कमरतरता, व्हेंटिलेटर्सबाबत चिंता व्यक्त केली. प्रशासनाच्या वतीने व्हेंटिलेटर्स खरेदीचा विषय मान्यतेसाठी आला होता. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून व्हेंटिलटर्स खरेदीला मंजुरी देण्यात आली.
महापालिकेच्या वतीने ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. सध्या मिरज तंत्रनिकेतनमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार आहे. १५० जम्बो सिलिंडरची क्षमता असलेल्या या प्रकल्पाला ८० लाख ते एक कोटीपर्यंत खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाची निविदा काढण्यासही सभेत मान्यता देण्यात आली. कुपवाड शहरासाठी नव्याने ३० कोटी रुपये खर्चाचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी आर्किटेक्ट नियुक्त करण्यासही मंजुरी देण्यात आली. याशिवाय प्रतापसिंह उद्यानात शिवसृष्टी व मिरजेतील महापालिकेच्या रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी आर्किटेक्टची नियुक्ती करण्यात आली.
चौकट
एलईडी निविदेला मुदतवाढ
महापालिका क्षेत्रात एलईडीचा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे; पण लाॅकडाऊनमुळे अनेक कंपन्यांना कागदपत्रे सादर करण्यास अडचणी आल्या आहेत. या कंपन्यांनी तसे पत्रही महापालिकेला दिले आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेला ७ मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याचे सभापती कोरे यांनी सांगितले.