सांगली : महापालिकेच्या माळबंगला येथील ३६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचा विस्तार करून ५६ एमएलडीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या योजनेतून सांगली व कुपवाड या दोन शहरांना पूर्वीपेक्षा शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणार आहे. या प्रकल्पाचा प्रारंभ १४ एप्रिलरोजी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महापौर हारूण शिकलगार यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले की, काँग्रेसच्या सत्ताकाळात २००६ मध्ये सांगली व कुपवाड शहरासाठी सुधारित पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. वारणा उद््भव निश्चित करून पाणी योजना आखण्यात आली. या योजनेचा प्रारंभ माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. त्यानंतर सत्तेवर आलेल्या विकास महाआघाडीने या योजनेत काही बदल केले. पण सुधारित आराखड्याला शासनाची मंजुरी घेऊन कामाला सुरूवात केली. पाण्याची टाकी, जलवाहिन्या टाकण्यासह माळबंगला येथील ५६ व ७० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम सुरू होते. त्यातील ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी अंदाजे तीन कोटी रुपये खर्च झाले आहेत. पूर्वीच्या ३६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात आली आहे. पाणी शुद्ध व स्वच्छ देण्यासाठी काही उपांगामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. शिवाय काही नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. दोन क्लेरिप्लोक्युलेटर्सची क्षमता वाढविल्याने पाणी शुद्ध होण्याचे प्रमाण वाढणार आहे. या प्रकल्पातून सांगली व कुपवाड या दोन शहरांना शुद्ध पाणी मिळणार आहे. त्याचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिलपासून करीत आहोत, असेही शिकलगार यांनी सांगितले. माळबंगला येथील दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रांचे काम पूर्ण झाल्यानंतर हिराबाग वॉटर वर्क्स येथील जलशुद्धीकरण केंद्र बंद करावे, असा प्रस्ताव होता. पण आम्ही हिराबागचे केंद्र बंद करणार नाही. माळबंगला येथील काम पूर्ण झाल्यानंतर हिराबाग जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे कामही हाती घेणार आहोत. भविष्यात सांगली शहर अंकली, धामणीपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे या केंद्राची गरज भासणार आहे. त्यामुळे हिराबाग वॉटर वर्क्स बंद करण्याचा प्रश्नच उद््भवत नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सांगली, कुपवाडला शुद्ध पाणीपुरवठा
By admin | Published: April 12, 2017 11:42 PM