मिरज : मिरजेत डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाणीच्या प्रकारांमुळे मिरजेतील डॉक्टर रात्रीच्यावेळी उपचारासाठी रुग्ण दाखल करून न घेण्याच्या पवित्र्यात आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या बैठकीत मारहाणीच्या निषेधार्थ एकदिवस बंद व रात्रीच्यावेळी रुग्ण न स्वीकारण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आरग येथील महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर बुधवारी नातेवाईकांनी दवाखान्यात गोंधळ घालून ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिवानंद सोर्टुर व त्यांच्या सहायकास मारहाण केली. मारहाणीच्या प्रकारामुळे शहरातील वैद्यक व्यावसायिक संतप्त आहेत. रात्रीच्यावेळी आलेल्या अत्यवस्थ रुग्णांना तातडीची सेवा म्हणून उपचारास दाखल करून घेतल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण होणार असेल, तर रात्रीच्यावेळी रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेणार नाही, असा काही वैद्यकीय व्यावसायिकांचा पवित्रा आहे. रात्रीच्यावेळी रुग्णांना आवश्यकता असेल त्यावेळी खासगी रुग्णालयाऐवजी शासकीय किंवा अन्य मोठी रुग्णालये उपलब्ध आहेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. काही प्रमुख डॉक्टरांनी रात्रीच्यावेळी जागा असेल तरच, रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात येईल, असे फलक रुग्णालयात लावले आहेत. डॉक्टरांना मारहाणीच्या घटनेबाबत आयएमए या संघटनेची उद्या रात्री बैठक होणार असून, मारहाणीच्या घटनेवर चर्चा होणार आहे. सोर्टुर यांना मारहाणीच्या निषेधार्थ एकदिवसाचा बंद व रात्रीच्यावेळी रुग्ण उपचारासाठी दाखल करून घ्यायचे की नाही, यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
रात्री रुग्णांना दाखल न करण्याचा पवित्रा
By admin | Published: October 31, 2014 1:09 AM