शीतल पाटील ल्ल सांगलीमहापालिकेच्या चार प्रभाग समिती सभापती निवडीच्या निमित्ताने सत्ताधारी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले. आता वर्षभर दोन्ही काँग्रेसकडून हातात हात घालून कारभार केला जाणार आहे. या नव्या आघाडीमुळे महापौर हारूण शिकलगार यांच्या राजीनाम्याला बळ मिळणार आहे. काँग्रेस नेत्यांसमोरील संख्याबळाची चिंताही काही प्रमाणात दूर होणार आहे. त्यामुळे महापौरविरोधक त्यांच्या राजीनाम्यासाठी आणखी आक्रमक होऊ शकतात. मात्र राजीनाम्याच्या खेळात ‘मिरज पॅटर्न’ निर्णायक भूमिका बजावू शकतो. महापालिकेच्या प्रभाग सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीसाठी आघाडी केली. दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी काही दिवसांपूर्वीच आगामी पालिका निवडणुकीत आघाडीचे संकेत दिले होते. त्याची सुरूवात प्रभाग २२ च्या पोटनिवडणुकीपासून झाली होती. काँग्रेसने ही पोटनिवडणूक बिनविरोध करून एक पाऊल पुढे टाकले. त्याची परतफेड करीत राष्ट्रवादीने प्रभाग समितीच्या निवडी बिनविरोध करण्यास मदत केली. अपवाद केवळ मिरजेतील प्रभाग चारचा! पालिकेच्या चारही प्रभाग समित्यांची निवडणूक राष्ट्रवादीने लढविली असती, तर किमान दोन प्रभाग समित्यावर त्यांचे वर्चस्व राहिले असते. तरीही राष्ट्रवादीने तीन प्रभाग समित्या काँग्रेससाठी सोडल्या. केवळ एका प्रभाग सभापती पदावर समाधान मानले. पण निवडीच्या राजकारणात प्रभाग चारचे सभापतीपद राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या शुभांगी देवमाने यांना मिळाले. पण त्यामागे मिरज पॅटर्नचा हात होता. शिवाय राष्ट्रवादीने, देवमाने हे काँग्रेसचे सभापती आहेत, असे जाहीर करून मिरज पॅटर्नच्या तिरक्या चालीचे पाप काँग्रेसच्या पदरात टाकले आहे. प्रभाग समित्यांसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्याने गेल्या दोन वर्षापासून महापालिकेत अल्पमतात असलेल्या काँग्रेसला चांगलाच हात मिळाला आहे. दोन वर्षापासून काँग्रेसअंतर्गत गटबाजी उफाळून आली. मदनभाऊ गट आणि उपमहापौर गट अशी दोन शकले झाली. उपमहापौर गटात काँग्रेसचे आठ ते दहा नगरसेवक होते. त्यामुळे बहुमतातील सत्ताधारी अल्पमतात गेले. उपमहापौर गटाने विरोधाची भूमिका घेतल्याने काँग्रेस अडचणीत आली होती. त्यात वर्षभरापासून तर काँग्रेस बँकफूटवरच होती. संख्याबळ नसल्याने पालिकेचा गाडा हाकण्यात अडचणी येत होत्या. त्यात वर्षभराने होणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला भाजपचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. भाजपच्या तोडीस तोड विकासकामेही करावी लागणार आहेत. पण आता ही चिंता काही प्रमाणात मिटली आहे. गेल्या चार महिन्यापासून काँग्रेसमध्ये महापौर बदलाचे वारे वाहू लागले आहे. महापौर हारूण शिकलगार यांना दहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्याची मुदत संपली तरी, अल्पमतामुळे काँग्रेस नेत्यांनी महापौर बदलाचा विषय बाजूला ठेवला होता. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आ. डॉ. पतंगराव कदम व जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत महापौरांच्या राजीनाम्याचा विषय गाजला. डॉ. कदम यांनी नगरसेवकांची गोळाबेरीज झाल्यास पदाधिकारी बदलण्याची हमी दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पालिकेतील आघाडीमुळे आता महापौर हारुण शिकलगार यांच्या राजीनाम्याच्या मागणीला अधिक बळ मिळाले आहे. सत्ताधारी गटाला धसका : मिरज पॅटर्नचामहापालिका निवडणुकीच्या वर्षभर आधी मिरज पॅटर्न डोके वर काढत असतो. आताही त्याची सुरूवात झाली आहे. इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी, मैनुद्दीन बागवान अशा मिरजेतील नगरसेवकांनी उणीदुणी विसरून पुन्हा एकत्रित मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसमधील नायकवडी व आवटी गटाने गटनेते किशोर जामदार यांच्याविरूद्ध आघाडी उघडली आहे. जामदार यांना पदावरून हटविण्याची मागणी काँग्रेस नेत्यांसमोर केली होती. पण सांगलीच्या नगरसेवकांनी जामदारांना पाठिंबा देत, नायकवडी, आवटींचा डाव उधळून लावला. परिणामी मिरजेच्या राजकारणात जामदार एकटे पडले आहेत. त्यामुळे महापौरांचा राजीनामा व त्यानंतर नव्या निवडीत मिरज पॅटर्नची भूमिका निर्णायक राहू शकते. बहुमताचे गणित...काँग्रेसकडे ३० ते ३२ नगरसेवक आहेत, तर राष्ट्रवादीकडे १७ नगरसेवक आहेत. यात मिरज पॅटर्नच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या नगरसेवकांना वगळले तरी, काँग्रेस बहुमताच्या जवळपास जाऊ शकते. उर्वरित विरोधक असलेल्या स्वाभिमानी आघाडी, उपमहापौर गटातही फाटाफूट असल्याने त्याचा फायदा उठवित महापौर बदल करता येईल, असे गणित मांडण्यास, महापौर पदासाठी इच्छुक असलेल्यांनी सुरूवात केली आहे.
महापौरांच्या खुर्चीला आघाडीमुळे धक्का
By admin | Published: May 01, 2017 12:10 AM