कुपवाड : तानंग (ता. मिरज) येथील थकीत वीज कनेक्शन तोडत असताना महावितरणचे साहाय्यक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांना ग्राहकाने व तीन महिलांनी धक्काबुक्की व दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये संजय राजाराम मोरे (वय ४२), वंदना संजय मोरे (३३), भारती दिनकर मोरे (५६), नंदा दिलीप मोरे (६०, सर्व रा. तानंग) यांचा समावेश आहे.
महावितरण कंपनीचे सहायक अभियंता सचिन राजेंद्र सदामते व त्यांचे अन्य सहकारी तानंग गावात एक वर्षावरील थकीत वीज बिलाची वसुली करीत होते. अधिकाऱ्यांनी गावातील संजय मोरे या ग्राहकाला भेटून थकीत वीज बिलापोटी ५० टक्के रक्कम भरा अन्यथा तुमचे वीज कनेक्शन तोडले जाईल, असे समजावून सांगितले.
या वेळी संजय मोरे व अन्य तीन महिला अशा चार जणांनी ‘वीज बिल भरणार नाही, तुम्ही कसे आमचे कनेक्शन बंद करता ते बघू,’ असे म्हणून गोंधळ घातला. साहाय्यक अभियंता व कर्मचारी यांना चौघांनी शिवीगाळ करून दमदाटी करत धक्काबुक्की केली.
दरम्यान, या चौघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार अधिकाऱ्यांनी कुपवाड पोलिसात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.