वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे विनापरवाना वाळूचा ट्रॅक्टर पकडणाऱ्या तलाठ्यास धक्काबुक्की करून धमकी देत वाळू तस्कराने ट्रॅक्टरसह पलायन केले. रविवारी सकाळी ६ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी चंद्रशेखर जयवंत देशमुख (वय ३५, रा. वांगी) व अनाेळखी ट्रॅक्टर चालकाविरोधात चिंचणी- वांगी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
कडेगाव तालुक्यात वांगी, शेळकबाव, शिवणी, वडियेरायबाग, भिकवडी, नेवरी, रामापूर आदी गावांत येरळा नदीच्या पात्रातून राजरोसपणे विनापरवाना वाळूउपसा सुरू आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. ही वाळूचोरी रोखण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी पथक तयार केले आहे. हे पथक वांगी येथे कारवाई करीत असताना धक्काबुक्कीचा प्रकार घडला.
मंडल अधिकारी प्रकाश दिगंबर सूर्यंवशी, तलाठी रघुनाथ आनंदा कुंभार व सहकारी वांगी ते सोनहिरा कारखाना रस्त्यावर रविवारी सकाळी ६ वाजता गस्तीवर हाेते. या वेळी वांगीकडून लाल रंगाचा वाळूने भरलेला ट्रॅक्टर भरधाव वेगाने येताना दिसला. त्यास पथकाने अडवले. त्यामध्ये १० हजार रुपये किमतीची विनापरवाना वाळू आढळून आली. दरम्यान, ट्रॅक्टरमालक चंद्रशेखर जयवंत देशमुख हा मोटरसायकलवरून तेथे आला. त्याने तलाठी रघुनाथ कुंभार यांना धक्काबुक्की करून त्यांच्या गाडीची चावी काढून घेतली. ‘माझ्या नादाला लागू नका तुम्हाला नोकरी करून देणार नाही.’ अशी धमकी देत वाळूच्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर घेऊन पलायन केले.
घटनेची फिर्याद मंडल अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी चिंचणी-वांगी पोलिसांत दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक संतोष साळुंखे हे करत आहेत.