लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात रस्ते, गटारीसह विविध विकासकामे सुरू आहेत, पण या कामाचे अंदाजपत्रक, कार्यारंभ आदेश, ठेकेदाराच्या नावाचा उल्लेख असलेले फलक कुठेच लावले जात नाही. त्यामुळे ही कामे मानकाप्रमाणे केली जातात की नाही, याचा पत्ता लागत नाही. त्यासाठी कामाची माहिती फलक लावावेत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा सुधार समितीच्यावतीने सोमवारी देण्यात आला.
याबाबत शहर अभियंता आप्पा हलकुडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, विकासकामाच्या ठिकाणी कामाची माहिती दर्शविणारे फलक दिसून येत नाहीत. त्यात कामाच्या ठिकाणी अधिकारी, कर्मचारीही फिरकत नाहीत. त्यामुळे अंदाजपत्रकानुसार काम होते की नाही, हे समजून येत नाही. कामाचा दर्जा व मोजमापामध्ये घोळ होऊन महापालिका व सामान्य नागरिकांच्या कररूपी पैशाचे नुकसान होत आहे. यापूर्वीही सुधार समितीमार्फत या विषयावर आंदोलने करण्यात आली होती. तसेच रोड रजिस्टर घालून ते अद्ययावत ठेवण्याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र, तात्पुरत्या मलमपट्टीशिवाय प्रशासनाने काहीही केलेले नाही. कामाबद्दल स्थानिक नागरिकांच्या तक्रारीचे निरसन करूनच ठेकेदारांची बिले अदा करण्यात यावीत. तसेच महापालिकेचे रोड रजिस्टर अद्ययावत ठेवण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी ॲड. अमित शिंदे, जयंत जाधव, महालिंग हेगडे, नितीन मोरे, प्रवीण कोकरे, दाऊद मुजावर, युवराज नाईकवाडे, प्रशांत साळुंखे, रोहित शिंदे, बापू कोळेकर, बंडू डफळापुरे, अजित पवार, सागर माळी, विनायक बलोलदार, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : महापालिकेने विकासकामाचे माहिती दर्शविणारे फलक लावावेत, या मागणीचे निवेदन शहर अभियंत्यांना देण्यात आले. यावेळी ॲड. अमित शिंदे, जयंत जाधव, महालिंग हेडगे उपस्थित होते.