जत : जत ते सांगोला रस्त्यावर जत शहरापासून दाेन किलाेमीटर अंतरावर माळी वस्तीनजीक रस्त्याकडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या सराफ व्यावसायिकास डोळ्यांत चटणी टाकून लुटण्यात आले. व्हॅनमधून आलेल्या चाैघा दरोडेखोरांनी सुमारे २ कोटी ३३ लाख रुपये किमतीची ४ किलो ६०० ग्राम सोन्याची बिस्किटे हातोहात लंपास केली. ही घटना गुरुवारी रात्री एक वाजता घडली. याप्रकरणी बाळासाहेब वसंत सावंत (वय ३५, रा. पळसखेल, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेमुळे जत तालुक्यातील सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
बाळासाहेब सावंत हे अन्य एका सहकाऱ्यांसह गुरुवारी सायंकाळी बेळगाव (कर्नाटक) येथून २४ कॅरेट सोन्याची बिस्किटे घेऊन माेटारीतून (केए २२ एमबी ५४२३) शेगाव (ता. जत) येथील सराफ व्यापारी संजय नलवडे यांना देण्यासाठी येत होते. एका कापडी बॅगेत त्यांनी ही बिस्किटे ठेवली हाेती. मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान माळी वस्तीनजीक रस्त्याच्या कडेला माेटार उभी करून दाेघे लघुशंकेसाठी थांबले. यावेळी त्यांच्या पाठीमागून पांढऱ्या रंगाची एक व्हॅन येऊन थांबली. त्यातून तोंडावर कापड बांधलेले ३० ते ३५ वयोगटातील चाैघे संशयित उतरले. त्यांनी सावंत व त्यांच्या सहकाऱ्याच्या डोळ्यांत चटणी टाकून त्यांना बेदम मारहाण सुरू केली. त्यांनी आरडाओरडा करून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना थांबवून मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत माेटारीतील २ कोटी ३३ लाख १३ हजार ५०० रुपये किमतीचे सोने घेऊन संशयितांनी जत शहराच्या दिशेने पलायन केले. जाताना दरोडेखोरांनी दोघांचे मोबाइल फोनही हिसकावून घेतले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी त्वरित परिसरात नाकाबंदीचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, सहायक पोलीस निरीक्षक महेश मोहिते, हवालदार बजरंग थोरात, उमर फकीर यांच्यासमवेत तत्काळ घटनास्थळी भेट देऊन दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु यश आले नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी बेळगाव व आटपाडी येथे पोलीस पथक पाठविण्यात आले आहे.
चाैकट
पडताळणी होणार
ही घटना बनवाबनवी आहे की, वस्तुस्थिती आहे. याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. यासाठी पोलिसांचे विशेष पथक बेळगाव येथे पाठविले आहे. सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी सकाळपासून जत येथे ठाण मांडून बसले आहेत. ठसे तज्ज्ञ व सायबर क्राइम विभागानेही घटनेची माहिती घेऊन तपास सुरू केला आहे. घटना घडलेल्या परिसरातील फिर्यादी व इतरांचे मोबाइल लोकेशन तपासून तपासाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.
फाेटाे : १५ जत १..२
ओळ : जत ते सांगोला रस्त्यावर जत शहरापासून दाेन किलाेमीटर अंतरावर माळी वस्तीनजीक चाैघा दरोडेखोरांनी गुरुवारी रात्री बाळासाहेब सावंत अडवून दाेन काेटी ३३ लाखांचे साेने लंपास केले.