जत : जत शहरासह तालुक्यातील शासकीय कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्य नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांनी याची दखल घेऊन उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्याच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाने पाच दिवसांचा आठवडा केला आहे दोन दिवस सुटी असते. या पाच दिवसांतच नागरिकांना कार्यालयीन कामे करून घ्यावे लागतात. मात्र बऱ्याचवेळा कार्यालयाची वेळेत कर्मचारी उपस्थित नसतात. यामुळे ग्रामीण भागातून जत शहरात कार्यालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. जत तहसीलदार कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग व भूमी अभिलेख कार्यालय येथील कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जाऊन वरिष्ठांना याचा जाब विचारला असता त्यांनाही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. वरिष्ठांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही मुकेश पवार यांनी निवेदनात केली आहे.
कृष्णा कोळी, शंकर बिचुकले, बलभीम पाटील, श्रीकृष्ण तळेकर यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहे.