विकास शहाशिराळा : वारणावती (ता. शिराळा) येथील वसाहतीमध्ये आज रात्री साडेआठच्या सुमारास भल्या मोठ्या अजगराचे दर्शन झाले. परिसरातील काही युवकांना अजगर निदर्शनास येताच त्यांनी सर्पमित्र तसेच वन अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर तब्बल अडीच ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर या अजगराला पकडण्यात यश आले. रोहित मेंगाणे, मनोज मेलकरी, सुरज कोळी, गणेश कोळी, अशपाक गुड्डापुरे या युवकांना रात्रीच्या वेळी अजगर निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ सर्पमित्र संग्राम कुंभार यांना याबाबत कळवले. माहिती मिळताच सर्पमित्र कुंभार घटनास्थळी दाखल होते त्यांनी वन्यजीव अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. वन्यजीवचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तब्बल अडीच ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर या अजगराला पकडण्यात यश आले. रात्रीची वेळ त्यात वसाहतीत अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे त्याला पकडण्यासाठी वन्यजीव कर्मचारी तसेच सर्पमित्रांना कसरत करावी लागली.साधारण ११ फूट लांब व ६० ते ७० किलो वजनाचा हा भला मोठा अजगर आढळल्याने भीतीचे वातावरण आहे. गेल्या महिनाभरापूर्वी करमणूक केंद्राजवळ भल्यामोठ्या अजगराचे दर्शन झाले होतं. त्यामुळे हे अजगर तोच आहे की दुसरा याबाबत मात्र स्पष्ट समजू शकले नाही. वन्यजींवच्या ताब्यात सध्या हा अजगर असून त्याला सुरक्षित स्थळी सोडण्यासाठी रात्री उशिरा कर्मचारी रवाना झाले.
सांगलीतील वारणावती वसाहतीमध्ये अजगराचे पुन्हा दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 3:26 PM