खानापूर : स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या अनेक अज्ञात क्रांतिवीरांचा इतिहास बलवडी (ता. खानापूर) येथील क्रांतिवनात वृक्षरूपाने जिवंत करण्यात आला आहे. नव्या तंत्रस्नेही काळातील तरुणाईला तो अधिकाधिक सुस्पष्ट व्हावा यासाठी आता क्यूआर कोडच्या रूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे.
शनिवारी (दि. ४) बलवडी येथे एका कार्यक्रमात क्यूआर कोडचे अनावरण केले जाणार आहे. हे कोड क्रांतिस्मृती वनातील प्रत्येक वृक्षावर लावले आहेत. मोबाइलद्वारे स्कॅन करताच क्रांतिकारकाचा त्यागमय इतिहास समजणार आहे. हुतात्म्यांचा रोमांचकारी इतिहास ऐकून पर्यटकांना राष्ट्रप्रेमाची अनुभूती होईल, असे भाई संपतराव पवार यांनी सांगितले.
शनिवारच्या कार्यक्रमात उद्योगपती संजय किर्लोस्कर यांच्याहस्ते सुभाषचंद्र बोस स्मृती कट्ट्याचे अनावरण होईल. क्यूआर कोडचे प्रात्यक्षिकही होईल. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या हस्ते महात्मा गांधी स्मृती कट्ट्याचे अनावरण व त्यांच्या क्यूआर कोडचे प्रात्यक्षिक होईल. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील कट्ट्याचे अनावरण व क्यूआर कोडचे प्रात्यक्षिक होईल. क्रांतिस्मृती वनात दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम होईल. संयोजक भाई संपतराव पवार, ॲड. संदेश पवार, प्रा. अनिल पाटील, भाई चंद्रशेखर नलावडे-पाटील यांनी ही माहिती दिली.