सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधात शासनाने काही बदल केले आहेत. गुरुवारी रात्री आठपासून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परजिल्ह्यातून कोणी जिल्ह्यात आल्यास त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिली.
कोरोनाविषयक उपाययोजना व कडक निर्बंधांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, वाढता संसर्गाचा धोका ओळखून शासनाने अजून काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार विनाकारण जिल्ह्याबाहेर जाण्यास बंदी असणार आहे. अत्यावश्यक कारणांसाठीच प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय जिल्ह्याबाहेर जाऊ दिले जाणार नाही. खासगी बससेवेतून परजिल्ह्यातून कोणी जिल्ह्यात आले तर त्याच्या हातावर शिक्का मारत त्या व्यक्तीस १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येईल.
विवाह समारंभासाठीही २५ लोकांची अट असून जादा आढळून आल्यास दंड करण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पोलीस, महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनाला निर्देश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे उपस्थित होते.
चौकट
‘सिव्हिल’मधील ऑक्सिजन प्रकल्प १० दिवसात कार्यान्वित
सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प कार्यन्वित नसल्यावरून होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येत्या दहा दिवसात हा प्रकल्प सुरू होईल. हा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प नसून येथेही बाहेरूनच ऑक्सिजन आणून भरावा लागणार आहे. तरीही लवकरात लवकर प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.