लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील काळ्या खणीच्या सुशोभीकरणाला अखेर गती मिळणार आहे. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी २८ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी दिली.
शहराच्या मध्यवर्ती भागात दहा एकराहून अधिक जागेत काळी खण आहे. या खणीच्या सुशोभीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. काँग्रेस नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी खणीच्या सुशोभीकरणाची मागणी केली होती. आयुक्त नितीन कापडणीस यांनीही पदभार हाती घेतल्यापासून या खणीच्या सुशोभीकरणावर अधिक लक्ष केंद्रीत केले. नुकतेच खणीलगत सेल्फी पाँईट उभारण्यात आला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. खणीत विविध रंगांची उधळण करणारा कारंजाही सुरू आहे. खणीला सरंक्षक भिंत नसल्याने अपघातही होत होते. आयुक्तांनी तातडीने तारेचे कंपाैंड केले आहे.
त्यात उर्वरित कामासाठी १ कोटी २८ लाख रुपयांचा प्रस्ताव महापालिकेच्या समाजकल्याण विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता काळी खण सुशोभिकरण मार्गी लागेल, असे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.
चौकट
३५ कोटीची गरज
वास्तूविशारद प्रमोद चौगुले यांच्याकडून काळी खण सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. काळी खणाच्या संपूर्ण सुशोभीकरणासाठी ३५ कोटीची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाकडे १० कोटी तर केंद्राकडे २५ कोटींचा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले.
चौकट
कोट
शहरातील काळी खणीचे सुशोभिकरण करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. अखेर त्याला यश आले असून सव्वा कोटीचा निधी मंजूर झाला आहे. खणीचे सुशोभीकरण झाल्यास नागरिकांसाठी एक चांगले पर्यटनस्थळ निर्माण होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडेल.
- वर्षा निंबाळकर, नगरसेविका