कडेगाव : चिंचणी (ता. कडेगाव) येथे पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अशाचत येथील हायस्कूलमधील बंद केलेले विलगीकरण कक्ष पुन्हा सुरू करावे लागणार आहे. मात्र शाळा सुरू करण्यासाठी शासनाने सूचना दिल्याने आता विलगीकरण कक्ष कोठे सुरू करावे, यासाठी ग्रामपंचायतची कोंडी झाली आहे.
चिंचणी गावात सध्या कोरोनाचे ५७ सक्रिय रुग्ण आहेत. विलगीकरण केंद्र सुरू नसल्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या व होम आयसोलेशनची सुविधा नसलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे. शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाचे परिपत्रक निघाले असले तरी शाळा सुरू करण्यासाठी परिस्थिती सध्या अनुकूल नाही.
दुसऱ्या बाजूला येथील विलगीकरण केंद्र तत्काळ सुरू करावे अशा प्रशासनाच्या सूचना आहेत. त्यामुळे विलगीकरण केंद्र सुरू करण्यासाठी सुसज्ज इमारत असलेली जागा शोधण्यासाठी ग्रामपंचायतीची धावपळ सुरू आहे. गावात प्राथमिक शाळांच्या इमारती आहेत, परंतु तेथे पाणी आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. गावातील शासकीय वसतिगृहात तालुकास्तरावरील कोरोना केअर सेंटर सुरू आहे. त्यामुळे तेथेही विलगीकरण केंद्रासाठी जागा नाही.
गावातील ग्रामीण रुग्णालयात कोविड हेल्थ सेंटर सुरू आहे. पाटबंधारे विभागाच्या कॉलनीची पडझड झाली आहे. प्रत्येक विधायक कामासाठी या गावातील शेतकऱ्यांनी जमिनी दान केल्या आहेत, मात्र याच गावाला आज संकटकाळात इमारत उपलब्ध होत नाही.
चौकट :
राज्यमंत्र्यांवर भिस्त
चिंचणी येथील विलगीकरण केंद्रासाठी इमारत उपलब्ध होत नसल्याने ग्रामपंचायत हतबल झाली आहे. गावासमोर कोरोनाचे संकट आ वासून उभे आहे. अशा स्थितीत लोकप्रतिनिधी या नात्याने राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी लक्ष घालावे. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोणतीही इमारत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.